((तीन मेन))
............
गुरुजनांचा सन्मान, दहीहंडी उत्सव साजरा
धाराशिव शहरासह जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांत कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ५ ः भारतीय तत्त्वज्ञान आणि शिक्षणाचा पाया रचणारे महान शिक्षणतज्ज्ञ तथा देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच शिक्षक दिन धाराशिव शहरासह परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यासोबतच चिमुकल्यांच्या सांस्कृतिक उत्साहाने पारंपरिक दहीहंडी उत्सवही रंगला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे स्थान अद्वितीय असून, समाज आणि राष्ट्राला नवी दिशा देण्याचे कार्य शिक्षक करत असल्याचा सूर सर्वच ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमधून उमटला.
.......
रामकृष्ण परमहंस महाविद्यालय
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य डॉ. ए.के. मंजुळकर यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मराठी विभागातील डॉ. वैशाली बोबडे म्हणाल्या, की २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभा असलेला देश जुनाट चालीरीती, अंधश्रद्धा व धर्मभेद सोडून पुढे जात आहे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मंजुळकर यांनी, शिक्षकांनी स्वतः विद्यार्थी बनून विद्यार्थ्यांकडून ज्ञान ग्रहण केले पाहिजे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, असा मोलाचा सल्ला दिला. सूत्रसंचालन प्रा. उगिले यांनी केले. तर आभार प्रा. घुले यांनी मानले.
.........
आदर्श प्राथमिक विद्यामंदिर
आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, धाराशिव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दहीहंडी कार्यक्रम साजरा झाला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधा, कृष्ण आणि गोपिकांची आकर्षक वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रांगणात उभारलेल्या दहीहंडीसाठी विद्यार्थ्यांनी सुरेख मानवी मनोरे रचून पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडली. ''गोविंदा आला रे आला''च्या जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला होता. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्ये रुजवण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाची सांगता गोड खाऊ वाटपाने करण्यात आली.
......
व्ही.पी. एज्युकेशनल कॅम्पस
छत्रपती संभाजीनगर रोडवरील व्ही.पी. एज्युकेशनल कॅम्पसमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व मार्गदर्शक करण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दोन्ही महान पुरुषांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानावर विचार मांडले. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असून त्यांच्या संस्कारांमुळेच व्यक्तिमत्त्वाची खरी जडणघडण होते, असा संदेश याप्रसंगी देण्यात आला. सोहळ्यास कॅम्पसमधील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी कन्या प्राथमिक शाळा
समता सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मराठी कन्या प्राथमिक शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष ॲड. चौगुले आणि सचिव प्रा.डॉ. उषा वडणे यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा देत शिक्षकांनी राष्ट्रभक्ती व राष्ट्रशक्ती जोपासणारे संस्कार विद्यार्थ्यांना द्यावेत, असा संदेश दिला. यावेळी विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त करून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. पद्मसिंह पाटील विद्यामंदिर
डॉ. पद्मसिंह पाटील विद्यामंदिर येथेही शिक्षक दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
.........
धाराशिव ः येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिरात चिमुकल्यांनी मानवी मनोरे रचून दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला.
फोटो क्रमांक ः OSM26B06917