तांत्रिक अडथळे अन् अटींचा फेरा
- जिल्ह्यात ६७ हजार रेशन कार्डधारकांचे धान्य बंद
- आयकर नोंदणी, तांत्रिक त्रुटीचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २ : जिल्ह्याच्या रेशनिंग प्रणालीत विविध तांत्रिक आणि पात्रताविषयक त्रुटी समोर आल्यामुळे तब्बल ६७ हजार ८९९ रेशन कार्डधारकांना मिळणारे सवलतीचे धान्य तात्पुरते बंद करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने आधार स्टेटस, मर्यादेपेक्षा एकूण जादा उत्पन्न आणि दुबार लाभार्थ्यांचा समावेश आहे. दुष्काळी स्थितीत धान्य वितरण रोखले गेल्यामुळे या हजारो लाभार्थी कुटुंबांसमोर संकट उभे ठाकले आहे.
तालुकनिहाय त्रुटीयुक्त लाभार्थ्यांची आकडेवारी
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये धान्य वितरण रोखण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.
धाराशिव : १८,१४३
तुळजापूर : ८,५९६
लोहारा : ८,४०९
कळंब : ७,७२९
वाशी : ७,३६४
उमरगा : ७,०३९
भूम : ५,३९३
परंडा : ५,२२६
........
((पॉईंटर))
प्रमुख तांत्रिक त्रुटी आणि कारणे
- जिल्ह्यात तब्बल २७ हजार ७६१ लाभार्थी दुबार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
- निकषांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे किंवा अयोग्य ठरलेले २६,४०७ लाभार्थी यात अडकले आहेत.
- सायलेंट लाभार्थी (६,३८४), शासकीय वा निमशासकीय क्षेत्रात संचालक असलेले व्यक्ती (३,१९०), शंभर वर्षांपेक्षा वयोवृद्ध सभासद (१,०४२), ग्रॉस टर्नओव्हर (१,५६७), आधार स्टेटस मधील त्रुटी (१,१०८) आणि वाहन मालकी (३४५) यांसारख्या कारणांमुळे धान्य वितरण रोखण्यात आले आहे.
........
((चौकट))
नागरिकांची व्यथा, आयकर नोंदणीचा तिढा
अनेक कुटुंबांतील सदस्यांनी बँकांकडून शैक्षणिक किंवा इतर कर्जे मिळवण्यासाठी नाममात्र आयकर विभागात नोंदणी केली होती. मात्र, ही नोंदणी म्हणजे उत्पन्नात वाढ झाली असे नाही, तर ते कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक असल्याने केलेली प्रक्रिया आहे. केवळ या कारणांवरून सवलतीचे रेशन बंद करणे अन्यायकारक असल्याचे धान्यापासून वंचित राहिलेल्या रेशनकार्ड धारकांचे म्हणणे आहे. याशिवाय, मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक न केल्याने ई-केवायसी अपूर्ण असलेल्यांनाही धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
.......
((चौकट))
सर्व प्रकरणांची पडताळणी सुरू
पोर्टलवरूनच धान्य पुरवठा बंद केलेल्यांची यादी आलेली आहे. उत्पन्न कमी असूनही धान्य मिळत नसेल, निकषांत बसत असल्यास धान्य लाभापासून वंचित राहत असलेल्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात अर्ज करावा. पोर्टलवरील यादीची पडताळणी करण्यात येत आहे, अशी माहिती परंड्याचे तहसीलदार नीलेश काकडे यांनी दिली. कागदोपत्री नोंदींच्या आधारावर सरसकट निर्णय न घेता प्रशासनाने प्रत्यक्ष पडताळणी करावी आणि पात्र लाभार्थ्यांचे धान्य लवकरात लवकर पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी होत आहे. सर्व प्रकरणांची कसून पडताळणी सुरू असून, छाननीनंतर पात्र ठरणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला नियमितपणे धान्य वितरीत केले जाईल, अशी ग्वाही पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.