पहाटे हुडहुडी, दुपारी उन्हाचा चटका;

पहाटे हुडहुडी, दुपारी उन्हाचा चटका;
Published on: 
पहाटे गारवा, दुपारी उन्हाचा चटका आरोग्याची काळजी घ्याः तापमानातील बदलामुळे सर्दी, खोकला, थकवा बळावण्याची शक्यता ----- सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. २७ : शहरासह जिल्ह्यात पहाटे व दुपारच्या तापमानात जवळपास दुपटीचा फरक पडू लागला आहे. पहाटेच्या वेळी बोचरे वाऱ्यासह जाणवणारा गारवा आणि दुपारच्या सुमारास उन्हाचा वाढणारा चटका, अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामध्ये व्हायरल आजार बळावण्याची शक्यता अधिक आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सकाळच्या तापमानात घट होऊ लागली आहे. पहाटे तीन ते सहा या वेळेत तापमानाचा पारा कमालीचा खाली येऊ लागला आहे. पहाटेचे तापमान १७ ते २० अंशांदरम्यान राहात असून, दुपारचे तापमान ३४-३५ अंशांवर पोचत आहे. सकाळ व दुपारच्या तापमानात जवळपास दुप्पट तफावत आढळून येत असल्यामुळे शरीराला तापमानातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि विविध आजारांनी ग्रस्त तसेच श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ----- वातावरण व्हायरल आजाराला पोषक शहरासह जिल्ह्यात पहाटे बोचरे वारे वाहत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना सर्दी, घसा खवखवणे, खोकला, डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो. विशेषतः व्हायरल आजारास पोषक वातावरण असल्याने त्या आजाराचा धोका वाढला आहे. तर दुपारच्या उन्हात अधिक वेळ राहिल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन निर्जलीकरण, चक्कर येणे, अशक्तपणा आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. उन्हाचा तडाखा तीव्र असल्यास उष्णतेशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. ----- आहार ठेवा संतुलित बदलत्या वातावरणात आरोग्य जपण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाय करावेत. पहाटे घराबाहेर पडताना हवामानानुसार हलके उबदार कपडे वापरावेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक असल्यास अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. बाहेर जाताना टोपी, छत्री आणि हलक्या रंगाचे सैल कपडे वापरावेत. दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. घाम अधिक येत असल्यास आणि शरीरातील पाणी-क्षार कमी झाल्याची लक्षणे दिसल्यास योग्य द्रवपदार्थ घ्यावेत. आहारात ताजी फळे, भाज्या आणि हलका, संतुलित आहार ठेवावा. ----- लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका तीव्र चक्कर, बेशुद्ध पडणे, गोंधळल्यासारखे होणे किंवा शरीराचे तापमान खूप वाढणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. स्वतःहून औषधे घेणे टाळावे. ताप, खोकला किंवा त्रास दीर्घकाळ टिकल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ----- कमी तापमानात श्वासनलिका आकुंचित होऊ शकतात. त्यामुळे या वातावरणात पुरेशी काळजी घेणे आवश्यक असते. तसेच श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींनी पहाटेचा गारवा आणि दुपारचे कडक ऊन यांचा विचार करून दिनचर्येत योग्य बदल करणे आवश्यक आहे. उबदार कपड्यांचा वापर, पुरेसे पाणी पिणे आणि आरोग्याच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे व आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. -डॉ. कैलास रेंगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com