अतिक्रमित घरांचे प्रस्ताव पाठवण्यासाठी ग्रामपंचायत उदासीन
टेंभुर्णी, ता. ९ : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे जवळपास एक हजार घरे अतिक्रमित असून, शासनाच्या नियमानुसार ही घरे नियमाकुल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे अद्याप नियमाकुल करण्यासाठीचे प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आलेले नाहीत. अतिक्रमित घरे नियमाकुल करण्याचे प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठवावेत, अशी मागणी येथील शेख फसर शेख रऊफ यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले की, टेंभुर्णी येथे जवळपास एक हजार घरे अतिक्रमित असून, ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अतिक्रमित घरांचे नियमाकुल करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. मात्र, टेंभुर्णी येथून अद्याप एकही प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीने केलेली नाही. या संदर्भात आमदार संतोष दानवे यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांना आपापल्या गावातील अतिक्रमित घरे नियमाकुल करण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच, प्रस्तावाची एक प्रत आपल्याकडे जमा करण्याचे तोंडी आदेशही दिले होते. तरीही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. परिणामी, गोरगरीब नागरिकांना त्यांच्या घरांपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे अतिक्रमित घरे नियमाकुल करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून तातडीने प्रस्ताव पाठवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.