esakal | कोरोना रोखण्यासाठी प्रशासन सतर्क; मात्र आरोग्य विभाग गायब

बोलून बातमी शोधा

Corona
कोरोना रोखण्यासाठी प्रशासन सतर्क; मात्र आरोग्य विभाग गायब
sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद) : सुलतानपुर (ता.पैठण) येथील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी 'दै. सकाळ'ने वृत्त प्रकाशित करताच तालुका प्रशासन सतर्क झाले असून पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशानंतर आरोग्य विभाग सोडता सर्व विभागाचे कर्मचारी गावांत बुधवारी (ता.२२) पोहचले असून गावांत सॅनिटाइझरची फवारणी करून कोरोना नियंत्रित करण्याची नियमावली समजावून सांगण्यात आली. 200 उंबऱ्याचे सुलतानपूर गाव अवघे कोरोनाने संक्रमित झाले.

या गावांसह परिसरात आरोग्य विभागाने भेटी देऊन कोरोना नियंत्रणासंबंधी जनजागृती केली नाही. मात्र गावांतील रुग्णांची संख्या लक्षात घेता तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी सुलतानपूर (ता.पैठण) गावांस मायक्रो कटेनमेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) म्हणून घोषीत केले, एवढेच नव्हे तर सर्व विभागांना गावांत तळ ठोकून राहण्याच्या सूचना दिल्या. तहसिलदाराचे आदेश प्राप्त होताच मंडळाधिकारी इंदेलसिंग बहूरे, तलाठी श्री. बोंद्रे, कृषी सहायक श्री देवरे, शिक्षक फड ए. ए., चव्हाण पी. आर, उकिरडे एम. एल., नेहाले जी. डी., ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्यामार्फत गावातील एकूण 90 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येवून त्यांना कोविड पॉझिटिव्ह रुग्णांपासून स्वतःची काळजी घेणे, बाधित रुग्णांशी करावयाचा व्यवहार, बाधित रुग्णांचे उपचार पद्धती, सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटाईझरचा वापर या विषयी मार्गदर्शन केले.

दरम्यान गावातील बहुतांश पॉझिटिव्ह रुग्ण सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी फिरताना पाहुन त्यांना आवर घालण्यासाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गजानन दोंड यांनी स्वखर्चातून सॅनिटाईझर उपलब्ध करुन दिल्यानंतर संपूर्ण गावांत सॅनिटाइझरची फवारणी करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी औषध-गोळ्याची मागणी केली असता आरोग्य प्रशासनाने तुटवड्याचे कारण पुढे करून औषधी नसल्याचे सांगितले. मात्र तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी दम भरताच दोन दिवसांचा प्रत्येकी (आठ गोळ्या) रुग्णांना आरोग्यसेविकेद्वारे वाटप करण्यात आल्या.

नांदर व बालानगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदासीन वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांकडे डोळेझाक करुन आरोग्य सहाय्यकावर जबाबदारी सोपवून 'हात' वर केल्याने कोरोना बाधीतांच्या संख्येत भर पडत आहे. बहुतांश ग्रामस्थ परस्पर तपासण्या करून विविध रुग्णालयात स्वतःहून उपचार घेत आहे. आरोग्य विभागाच्या उदासिन भूमिकेविरूध्द सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सर्वांना मास्क वापरणे, व्यवहार बंद ठेवून सामाजिक अंतर पाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, दुर्लक्षित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी गजानन दौंड, एकनाथ आंधळे, रमेश दौंड यांनी केली.

तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी गावांतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी पर्याय म्हणून शेतीत सुविधा असेल तर तेथे काही दिवसासाठी विलगीकरण करावे, असा सल्ला देऊन सामाजिक अंतर ठेवण्यासोबतच मास्क व सॅनिटाईझरचा वापर करावा, जोपर्यत कोरोना आटोक्यात येत नाही, तोपर्यत शासनाने ठरवून दिलेले निर्बंध पाळावेत.