
छत्रपती संभाजीनगर : ‘‘मित्रा माझी लाइफ खूप छान होती रे, माझ्या हत्येचे कारण तूच... असे स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवत ॲक्सिस बॅंकेच्या सहायक व्यवस्थापकाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. विठ्ठल मधुकर सदार (वय २८, मूळ रा. खडकी सदार, रिसोड, वाशीम) असे या तरुणाचे नाव आहे. औरंगपुरा धनमंडी भागात हा प्रकार ३१ जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आला. दरम्यान, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलच्या माध्यमातून पुण्याच्या एका व्यक्तीने तलाठी भरतीसाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची रक्कम घेतली होती. या प्रकारात त्याची फसवणूक झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. याप्रकरणी सिटी चौक पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
विठ्ठल हा आठ वर्षांपासून शहरात वास्तव्यास होता. धनमंडी, नारळीबाग भागात तो चार मित्रांसह एका फ्लॅटमध्ये राहत होता. ॲक्सिस बँकेत काम करीत असतानाच विठ्ठल स्पर्धा परीक्षेची तयारीदेखील करीत होता. ३१ जानेवारीला विठ्ठलने मोबाइल व्हॉट्सॲपवर भावनिक स्टेटस सर्वांना सोडून जात असल्याचा उल्लेख केला. त्याच्या मित्रांनी हे स्टेटस पाहताच फ्लॅटकडे धाव घेतली. यावेळी फ्लॅटमध्ये एकट्या असलेल्या विठ्ठलने गळफास घेत आत्महत्या केल्याचे आढळून आले. मित्रांनी तातडीने सिटी चौक पोलिसांना ही माहिती दिली. विठ्ठलचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह मूळ गावी अंत्यविधीसाठी रवाना करण्यात आला.
फसवणूक झाल्याने टोकाचे पाऊल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना त्याची ओळख त्याच भागात अभ्यासिका चालवणाऱ्या पुण्याच्या एका व्यक्तीसोबत झाली. या व्यक्तीने तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये आपली लिंक असल्याचे सांगितले. विठ्ठल हा त्याच्या जाळ्यात अडकला. त्याने अंदाजे दहा उमेदवारांकडून लाखो रुपये रक्कम घेत या व्यक्तीच्या स्वाधीन केली. तलाठी भरतीचा निकाल लागल्यानंतर हे उमेदवार नापास झाले. या उमेदवारांनी आपली रक्कम परत करण्यासाठी विठ्ठलकडे तगादा लावला. विठ्ठलने अभ्यासिका बंद करून पुण्याला गेलेल्या या व्यक्तीची भेट घेत पैसे परत करण्याची मागणी केली. या प्रकरणानंतर विठ्ठल सातत्याने तणावात होता. बुधवारी त्याने या तणावातून आत्महत्या केली असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
विठ्ठल आणणार होता विठ्ठलाची मूर्ती
विठ्ठल हा गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. बुधवारी सकाळी त्याने रूममेटला आपण विठ्ठलाची मूर्ती आणून घेऊ, आपल्यावर संकटं सुरू आहेत. विठ्ठल आपल्यावरील संकट दूर करेल, असा आशावाद त्याने मित्रासोबत व्यक्त केला होता. यानंतर मित्र बाहेर गेल्यानंतर त्याने काही वेळात गळफास घेतला. त्यापूर्वी त्याने आपला मोबाइल फोन फॉरमॅट केला. सिम तोडून टाकले. तसेच मोबाइल देखील फोडून टाकला असल्याची माहिती मित्रांनी दिली.
काय आहे व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये?
‘‘मित्रा माझी लाइफ खूप छान चालू होती रे... तू जो माझ्यासोबत दगाफटका केला ना, फक्त माझाच नाही तर एका बापाचा आणि एका आईचा आधार घेऊन चालला, मी तर चाललो सोडून. कारण तू जे केलंस, त्याचं एवढं मोठं ओझं नाही झेलू शकत मित्रा. माझ्यासोबत केलं ना तू, ते फक्त दुसऱ्यासोबत नको करू, माझी हत्या हीच तुझी पनिशमेंट, माझ्या हत्येचं कारण तूच. तुझं नाव तर नाही घेत मित्रा, फक्त माझ्यासारखं फसवू नको कोणाला, तुला हात जोडून सांगतो मित्रा... शक्य झाले तर भाऊ आणि आई-बाबाला सांभाळ. असं अर्ध्यावर सोडून चाललो मी तुम्हाला आणि एका व्यक्तीला पण.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.