Aurangabad : फरार म्हणतो, ‘तो मी नव्हेच!’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covide test

फरार म्हणतो, ‘तो मी नव्हेच!’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांच्या जागेवर डमी रुग्ण पाठविण्यात आल्याचा प्रकार महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड हॉस्पिटलमध्ये समोर आला होता. याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी बुधवारी (ता.१७) फरार रुग्णाला ताब्यात घेतले; पण त्याने तो मी नव्हेच असा दावा केला आहे. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानात कोरोना चाचणी करणारे पथकच आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर शनिवारी (ता. १३) उस्मानपुरा येथील गगन पगारे व म्हाडा कॉलनीतील गौरव काथार हे दोघेजण पॉझिटिव्ह निघाले होते. मात्र दोघा ऐवजी मेल्ट्रॉन कोविड हॉस्पिटलमध्ये मंठा तालुक्यातील तळणी येथील अलोक राठोड व अतुल सदावर्ते या दोघांना गगन पगारे आणि गौरव काथार या नावाने पाठविण्यात आले. मेल्ट्रॉनमध्ये त्यांना विजय मापारी व साबळे यांनी दाखल केले. दाखल दोघे वारंवार सुटी करण्याची मागणी करत असल्याने संशयावरून मेल्ट्रॉनच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगलकर यांनी चौकशी केली असता हे दोघे बनावट कोरोना रुग्ण असल्याचे समोर आले होते.

त्यानुसार त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गगन पगारे, गौरव काथार, बनावट रुग्ण अलोक राठोड, अतुल सदावर्ते, विजय मापारी व साबळे यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा तपास सुरू केला. दरम्यान म्हाडा कॉलनीत राहणारा गौरव गोविंद काथार हा मेल्‍ट्रॉनमध्ये दाखल झाला. त्याला वेदांतनगर पोलिसांनी तक्रारीत ताब्यात घेतले. पण गौरव काथार याने तो मी नव्हेच, मी उद्यानात गेलोच नाही, असा दावा केला.

अँटिजेन चाचणी निगेटिव्ह

गौरव गोविंद काथार हा मेल्ट्रॉनमध्ये येताच डॉ. वैशाली मुदगलकर यांनी त्याला जाब विचारला. त्यावर त्याने मी उद्यानात गेलो नाही, माझी कोरोनाची चाचणी झाली नाही, मला पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला, असे सांगितले. त्याची अँटिजेन चाचणी केली असता निगेटिव्ह निघाली. आरटीपीसीआर चाचणी केली असून, त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त होणार असल्याचे डॉ. वैशाली मुदगलकर यांनी सांगितले.

एक दिवस विलंब कशासाठी?

सिद्धार्थ उद्यानात १२ नोव्हेंबरला दोघेजण पॉझिटिव्ह निघाले. मात्र १३ रोजी दोघांना मेल्ट्रॉनमध्ये भरती होण्यासाठी पाठविण्यात आले असल्याचे डॉ. वैशाली मुदगलकर यांनी सांगितले. दरम्यान दुसरा संशयित गगन पगारेदेखील पॉझिटिव्ह आहे किंवा नाही याची खात्री देता येत नाही, त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर संशय व्यक्त होत असल्याने चौकशी केली जाईल, असे डॉ. मुदगलकर यांनी सांगितले.

loading image
go to top