‘टीआयई’ गव्हर्निंग कौन्सिलची घोषणा
----
२०२६-२८ या कालावधीसाठी आठ सदस्यांची निवड
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १७ : उद्योजकता परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि उद्योजकांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी टीआयई छत्रपती संभाजीनगर चॅप्टरच्या २०२६-२८ या कालावधीतील नवनिर्वाचित गव्हर्निंग कौन्सिलची घोषणा केली आहे. या कौन्सिलमध्ये आठ सदस्यांचा समावेश असून, त्यांच्या माध्यमातून उद्योजकांमधील संवाद, सदस्यांचा सहभाग आणि व्यावसायिक सहकार्य वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
नवनिर्वाचित गव्हर्निंग कौन्सिलमध्ये आशिष गर्दे, अशोक काळे, प्रताप धोपटे, संदीप सिंग, डॉ. हर्षाली देशमुख, सचिन काटे, निधी पंत आणि टीआयई, पुणेच्या अश्विनी देशपांडे यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील उद्योजकता क्षेत्राला चालना देणे, उद्योजकांसाठी अर्थपूर्ण व्यावसायिक संधी निर्माण करणे आणि नव्या व्यवसायांना मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, ही कौन्सिलची प्रमुख उद्दिष्टे असतील. उद्योजक, मार्गदर्शक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिक नेते यांच्यातील संपर्क अधिक दृढ करण्यावर संस्थेचा भर राहणार आहे. टीआयईच्या जागतिक नेटवर्कच्या सहकार्याने स्थानिक उद्योजकांना व्यापक व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सदस्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, संस्थेच्या आगामी प्राधान्यक्रमांना दिशा देणे आणि मराठवाड्यात उद्योजकतेसाठी अधिक सक्षम वातावरण निर्माण करणे, यासाठी नवी कौन्सिल काम करणार आहे. उद्योजकांना परस्पर सहकार्याच्या माध्यमातून विकासाच्या संधी मिळाव्यात आणि या संपर्कांचे प्रत्यक्ष व्यावसायिक लाभांमध्ये रूपांतर व्हावे, हा या पुढील कार्यकाळाचा मुख्य दृष्टिकोन असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.