टायर फुटल्याने कारच्या धडकेत
दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी
--------------------
पाथरी-मानवत मार्गावर अपघात
मानवत, ता.२१ (बातमीदार): पाथरीकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वार तरुणास कारने धडक दिल्याची घटना बुधवारी (ता.२१) सकाळी ११:१५ च्या सुमारास घडली. रत्नापूर टोल नाक्याजवळ मानवतकडून येणाऱ्या कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
बालाजी रमेश रेंगे (वय २१, रा. कानसूर, ता. पाथरी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
बालाजी रेंगे हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एम एच-२२ एइ- ३२२९) मानवतच्या दिशेने येत होते. याचवेळी पाथरीच्या दिशेने जाणारी कार (क्र.एमएच २० सी एच ५४७७) रत्नापूर टोल नाक्याजवळ पुढे आली असता, अचानक कारचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव कारने दुचाकीस जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार बालाजी रेंगे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मानवत पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती.
---------