तीर्थपुरीच्या विकास आराखड्यावरून संभ्रम!
१५ मीटर रुंदीचे रस्ते, खासगी जागांवरील आरक्षणांबाबत प्रश्न; नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यांचा पर्याय तपासण्याची मागणी
तीर्थपुरी, ता. १९ : येथील नगरपंचायतीच्या अंतिम प्रारूप शहर विकास आराखड्यावरून (डीपी प्लॅन) शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रस्तावित रस्त्यांचे रुंदीकरण, खासगी जागांवरील आरक्षणे, शाळा, मैदाने आणि व्यावसायिक वापरासाठी प्रस्तावित जागांबाबत नागरिकांमध्ये विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, विकास आराखड्याचा दुसरा अर्थात सिलेक्शन नकाशा प्राप्त झाल्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
नगरपंचायतीच्या विकास आराखड्यात १५ मीटर रुंदीचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. तसेच, विविध कारणांसाठी जागांवर आरक्षणे दर्शविण्यात आली आहेत. त्यामुळे खासगी जमीनमालकांच्या मालमत्तांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विकास आराखड्याचा सिलेक्शन नकाशा अद्याप प्राप्त झालेला नसल्याने प्रस्तावित रस्ते नेमके कुठून जाणार, कोणत्या जागांवर आरक्षणे आहेत आणि त्याचा संबंधित जमीनमालकांवर काय परिणाम होणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आराखडा तयार करताना नागरिक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले होते का, तसेच आराखडा तयार करणारी समिती कोणती होती, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. दरम्यान, शहर विकास आराखड्यातील रस्त्यांची रुंदी निश्चित करताना स्थानिक परिस्थितीचा विचार करण्यात यावा. संबंधित नियमांनुसार शक्य असलेल्या ठिकाणी नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यांचा पर्याय तपासावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक डॉ. प्रवीण कडुकर यांनी केली आहे.
...............
कोट
नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. तसेच, विकास आराखड्यावरील हरकती स्वीकारून त्या पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील.
- सुमीत हार्दे, मुख्याधिकारी, तीर्थपुरी नगरपंचायत