((सोमवारच्या अंकासाठी))
------
गणरायाच्या स्थापनेसाठी
हे साहित्य ठेवा तयार
----
घरच्या घरी गणेशपूजेचा सोपा विधी, मूर्तीपासून नैवेद्यापर्यंत
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १३ ः गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर घराघरांत गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली. बाप्पाच्या स्थापनेपूर्वी पूजेसाठी लागणारे साहित्य व्यवस्थित तयार ठेवणे आवश्यक असते. गणपतीची मूर्ती, चौरंग, कलश, फुले, दुर्वा, पंचामृत, नैवेद्य आणि आरतीचे साहित्य अशा विविध वस्तूंची आवश्यकता असते. कुटुंबाच्या परंपरेनुसार पुरोहितांच्या मार्गदर्शनाने किंवा साध्या पद्धतीने घरच्या घरीही गणेशाची स्थापना करता येते. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेत कोणतीही धावपळ होऊ नये, यासाठी पूजेच्या साहित्यापासून विधीपर्यंतची तयारी आधीच करून ठेवणे महत्त्वाचे आहे.
----
स्थापनेसाठी मूर्ती आणि आसन
-गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी स्वच्छ चौरंग किंवा पाट
-पाटावर अंथरण्यासाठी लाल किंवा पिवळे वस्त्र
-मूर्तीच्या स्थापनेसाठी अक्षता
-कलश, पाणी, आंब्याची पाने, नारळ
--
पूजेसाठी आवश्यक वस्तू
-हळद, कुंकू, गुलाल आणि चंदनाचे गंध
-जानवे तसेच मौली किंवा नाडा पूजेसाठी
-फुले, हार आणि विशेषतः जास्वंदाची फुले
-विड्याची पाने, सुपारी, लवंग आणि वेलची
---
दुर्वांना विशेष महत्त्व
गणेशपूजेत दुर्वांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. श्रद्धेनुसार गणरायाला २१ दुर्वा अर्पण केल्या जातात. दुर्वा वाहताना गणपतीचे नामस्मरण करावे.
--
पंचामृतासाठी तयारी
दूध, दही, तूप, मध आणि साखर यांपासून पंचामृत तयार करता येते. गणपतीला पंचामृताने स्नान घालण्याची परंपरा आहे. मात्र, मूर्ती कोणत्या साहित्याची आहे, याचा विचार करूनच अभिषेक करावा. यासाठी स्वतंत्र धातूची मूर्ती वापरण्याची पद्धतही काही कुटुंबांत आहे.
--
अशी करा मूर्तीची स्थापना...
-सर्वप्रथम पूजेची जागा स्वच्छ करा
-पाटावर वस्त्र अंथरून त्यावर अक्षता ठेवा
-त्यावर गणपतीची मूर्ती भक्तिभावाने स्थापित करा
-त्यानंतर गणरायाचे आवाहन करून मनोभावे प्रार्थना करा
-कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि मंगलकार्यासाठी संकल्प करा
------
गंध, फुले आणि नैवेद्य
गणपतीला चंदनाचे गंध, कुंकू आणि अक्षता अर्पण कराव्यात. त्यानंतर जास्वंद, झेंडूची फुले आणि हार अर्पण करावा. धूप किंवा उदबत्ती लावून दिवा प्रज्वलित करा. गणरायाला मोदक, लाडू किंवा घरच्या परंपरेनुसार गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा.
--
आरतीने पूजेची सांगता
नैवेद्य अर्पण केल्यानंतर गणपतीची आरती करावी. आरतीसाठी कापूर, निरांजन, वात, तूप किंवा तेल, आरतीचे ताट आणि घंटा तयार ठेवावी. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रित आरती करून गणरायाचे स्मरण करावे. पूजेतील विधी आणि साहित्याबाबत आपल्या कुटुंबाची परंपरा व स्थानिक धार्मिक प्रथा यांना प्राधान्य द्या.
--------