नेवरवाडीमध्ये सोयाबीनची सुडी,
धोतऱ्यात शॉर्टसर्किटने ऊस खाक
----
हदगाव, ता. ८ (बातमीदार): तालुक्यातील नेवरवाडी येथे शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुडीला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने संपूर्ण सोयाबीन खाक झाले. या घटनेत शेतकरी दत्ता बोडके यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, ऐन संकटाच्या काळात त्यांच्यावर दुहेरी संकट कोसळले.
दत्ता बोडके यांनी सोयाबीनची सोंगणी करून शेतात सुडी घातली होती. रात्री अचानक सुडीला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण सोयाबीन खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दुसऱ्या घटनेत तालुक्यातील धोतरा येथेही शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. शेतकरी रंजना सुरेश सूर्यवंशी यांच्या शेतातील ऊस पिकाला आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाल्याची माहिती दयानंद सूर्यवंशी यांनी दिली. शेतातील वीजवाहिन्या, विद्युत खांब व उपकरणांची तातडीने तपासणी करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशी मागणी होत आहे. दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च, बाजारभाव आणि आगीसारख्या संकटांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढत आहे. त्यामुळे महसूल विभागाने दोन्ही घटनांचे तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घ्यावा आणि नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.