गंगापूर ः येथे लिंबाच्या झाडाखाली चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा मारून दोन लाख रुपयाचे मुद्देमाल जप्त केला आहे.
गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलेगाव रस्त्यावरील तलावाजवळील एका लिंबाच्या झाडाखाली बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रम्मी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि चार दुचाकी वाहनांसह एकूण १ लाख ९२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस अंमलदार भूषण मनोहर देसाई यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती जान्हवी शेखर यांच्या सूचनेनुसार गुप्त खबरेद्वारे मिळालेल्या माहिती नुसार शुक्रवार (ता. १८ ) रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
पोलीस पथकाने घटनास्थळी छापा मारला असता काही इसम गोलाकार बसून पैशांवर रम्मी नावाचा जुगार खेळताना आढळले. पोलिसांना पाहताच एक जण पळून गेला, तर सोहेल सलीम पठाण (वय २२), उजेब बब्बु बागवान (वय २२) आणि धरमसिंग हरिचंद राजपूत (वय ४३, तिघे रा. गंगापूर) या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले.
संशयितांच्या झडतीमध्ये रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि घटनास्थळी उभ्या असलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.
याविषयी पोलीस हवालदार भूषण देसाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा छापा पोलीस उपनिरीक्षक फडे, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस जमादार पंचांगे, चव्हाण, खाडे यांनीही कारवाई केली आहे.