तेरा उमेदवारांचे अपिल विभागीय सहनिबंधकांना फेटाळले

तेरा उमेदवारांचे अपिल विभागीय सहनिबंधकांना फेटाळले
Published on: 
तेरा उमेदवारांचे अपील फेटाळले ---- लातूर जिल्हा बँक निवडणूक; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय कायम सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ३० ः लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद ठरवल्याने तेरा उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. या तेराही उमेदवारांच्या अपिलावर सुनावणी घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत सर्वांचे अपील फेटाळण्यात आले आहेत. या सर्व उमेदवारांना या निर्णयाच्या विरोधात आता उच्च न्यायालयातच धाव घ्यावी लागणार आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांनी उमेदवारी अर्ज बाद केलेल्या तेरा उमेदवारांनी येथील विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याकडे अपील केले होते. गेल्या काही दिवसांपासून या अपिलावर सुनावणी सुरू होती. यात आता या तेराही उमेदवारांच्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवत अपील फेटाळण्यात आले आहेत. अर्ज छाननीच्या वेळी संस्था थकबाकीदार असल्याने चाकूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील गोविंद माकणे, संस्थेवर संचालक नसल्याने अहमदपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व महिला प्रतिनिधी मतदारसंघातील अबोली विनायक पाटील, संस्था थकबाकीदार व अनुभव नसल्याने महिला प्रतिनिधी मतदारसंघातील मनोरमा पाटील, संस्थेवर संचालक नसल्याने उदगीर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातील सोनाली प्रमोद पाटील, संस्था थकबाकीदार असल्याने जळकोट मतदारसंघातील धर्मपाल देवशेट्टे, बँकेचे थकबाकीदार असल्याने हाउसिंग मतदारसंघातील सतीश शेषेराव जाधव, जिल्हा बँकेच्या खात्यावर संस्थेचा व्यवहार नसल्याने प्रक्रिया मतदारसंघ व इतर मागासवर्गीय मतदारसंघातील भरत चामले, लेखा परिक्षणाची वर्गवारी नसल्याने पतसंस्था मतदारसंघातील भीमाशंकर राचट्टे, हार्वेस्टरचे कर्ज थकीत असल्याने निलंगा मतदारसंघातील वामनराव पाटील, लेखा परीक्षण वर्गवारी नसल्याने प्रक्रिया मतदारसंघातील सचिन सुभाष पाटील, मतदार यादीत सभासद नसल्याने अनुसूचित जाती मतदारसंघातील राणी शिवलीकर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला होता. या सर्वांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. ते आता फेटाळण्यात आले आहे. नकला काढण्याची घाई विभागीय सहनिबंधकांनी अपील फेटाळल्याने या उमेदवारांना आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. त्यामुळे विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या निकालाच्या नकला काढण्यासाठी उमेदवारांची व त्यांच्या वकिलांची धावपळ या कार्यालयात दिसून आली. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.