साडेसात हजार नागरिकांच्या घराची स्वप्नपूर्ती
-----
दोन वर्षांत २० हजार घरकुले मंजूर; बांधकामाला १३ हजार लाभार्थींची उदासीनता
----
पांडुरंग उगले
माजलगाव, ता. १८ : सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे, यासाठी शासनाच्या विविध घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. माजलगाव तालुक्यात मागील दोन वर्षांत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी, मोदी आवास, यशवंत आवास आणि पु.अ. होळकर आवास योजनेतून तब्बल २० हजार ५९१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी सात हजार ५५१ लाभार्थींच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी अद्याप १३ हजार ४० नागरिकांमध्ये मात्र स्वतःचे घर बांधण्यात उदासीनता दिसून येत आहे.
शासनाच्या विविध योजनांमधून ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना घरकुलासाठी आर्थिक मदत देण्यात येते. घरकुल मंजुरीमुळे अनेक कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. मागील दोन वर्षांतील मंजुरीची आकडेवारी पाहता, तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे स्पष्ट होते. पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या सात हजार ५५१ असून, एकूण मंजूर घरकुलांपैकी ३६.६६ टक्के घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित १३ हजार ४० घरकुलांचे बांधकाम विविध टप्प्यांत सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी हजारो कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याची अपेक्षा आहे. अपूर्ण घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून लाभार्थींना मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य मिळणे महत्त्वाचे आहे.
--------
तालुक्यातील घरकुल योजनेचा लेखाजोखा
योजना - मंजूर घरकुल - पूर्ण झालेले घरकुल - अपूर्ण घरकुल
प्रधानमंत्री आवास - १७,२७६ - ५,६२११ - ११,६५५
रमाई आवास - १,१२७ - ४५३ - ६७४
मोदी आवास - १,७४४ - १,४२६ - ३१८
यशवंत आवास - १४७ - २४ - १२३
पु.अ. होळकर आवास - २८० - २१ - २५९
शबरी आवास - १७ - ६ - ११
--------
एकूण १०,५९१ - ७,५५१ - १३,०४०
---
((कोट))
विविध योजनांतून घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून स्वतःचे पक्के घर बांधून घ्यावे. घरकुलाच्या कोणत्याही अडचणीबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा.
- ज्योत्स्ना मुळीक, गटविकास अधिकारी, पंचायत समिती
----