जिल्हा परिषदेत निधीवरून महायुतीतच धुसफूस!
-----
समान वाटप करण्याची शिवसेना सदस्यांची मागणी
-----
धाराशिव, ता. ३१ (बातमीदार) : जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता असतानाही घटक पक्षांतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या वाटपावरून सत्ताधारी महायुतीतील शिवसेनेच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निधीचे समान वाटप करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील दहा टक्के रक्कम प्राथमिक शाळांतील स्वच्छतागृहे आणि काही गावांमध्ये अभ्यासिका उभारण्यासाठी खर्च करण्याचा ठराव आहे. मात्र, हा निधी सर्व सदस्यांना समान वाटावा, अशी मागणी आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या शिवसेनेच्या दहा सदस्यांनी जूनमध्येच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. दुसरीकडे, शिवसेनेच्या (यूबीटी) सदस्यांनीही निधीचा वापर गरजेनुसार करण्याची मागणी केली आहे. दुष्काळ व पाणीटंचाई निवारणासाठी शिल्लक निधी वापरण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, आमदार सावंत यांनी सहा महिन्यांत जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविण्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आगामी सर्वसाधारण सभेत निधीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका काय राहणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.