देवलगाव अवचार येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम
---------------
शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे यांनी केले मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १२ ः छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, श्रीमंतयोगी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.दहा) रोजी देवलगाव अवचार (ता. मानवत, जि. परभणी) येथे दुष्काळी परिस्थितीत मृदा व जलसंधारणाची कामे, उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी कार्यक्षम वापर या विषयावर शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
डॉ. मोरे यांनी बदलते पर्जन्यमान, हवामान बदलाचे शेतीवरील परिणाम, कोरडवाहू शेतीतील मृदा व जलसंधारणाचे महत्त्व, जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. शेतातील बांधबंदिस्ती, शेततळ्यांची निर्मिती, पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविणे, तसेच ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या उपाययोजनांमुळे पाण्याची बचत होऊन पीक उत्पादनात स्थिरता राखण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ पाण्याची उपलब्धता वाढविणे पुरेसे नसून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, कार्यक्षम वापरही तितकाच महत्त्वाचा आहे असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षस्थानी सरपंच केशवराव आवचार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच माणिकराव आवचार, प्रा. डॉ. राम मोरे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर आवचार यांनी केले. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गावपातळीवर मृदा व जलसंधारणाची लोकचळवळ उभी करणे, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि शेतकऱ्यांमध्ये जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन दिव्या शेळके, अश्विनी आवचार यांनी केले. श्याम आवचार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी इंजि. गोविंद आवचार, ॲड. गजानन आवचार, डॉ. महेश पान्हेरे, बालाजी दिवटे, मंगेश आवचार, श्याम आवचार, पंढरीनाथ आवचार आणि डॉ. ज्ञानेश्वर आवचार यांनी विशेष परिश्रम घेतले.
((कोट)))
बदलत्या हवामानामुळे अनियमित होत असलेले पर्जन्यमान, वाढती दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, पाणी अडवा, पाणी जिरवा, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत जलव्यवस्थापनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी.
-डॉ. मधुकर मोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ,
‘वनामकृवि’ परभणी
-------------