जिन्सी पोलिसांकडून तीन
दुकानदारांवर गुन्हे दाखल
-------
छत्रपती संभाजीनगर, ता. ४ : शहरातील गर्दीच्या चंपा चौक आणि रोशनगेट परिसरात दुकानांसमोर ग्राहकांसाठी कोणतीही वाहनतळ व्यवस्था न करता मुख्य रस्त्यावरच अस्ताव्यस्त वाहने उभी करण्यास मुभा देऊन वाहतुकीस अडथळा व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या तीन दुकानदारांवर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. ही कारवाई शनिवारी (ता. तीन) मध्यरात्री गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने केली.
जिन्सी ठाण्याचे पोलिस अंमलदार गजानन सुभाष खार्डे हे चालक वाघचौरे आणि पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह पीटर मोबाइल व्हॅनद्वारे हद्दीत रात्रपाळी गस्त घालत होते. शनिवारी रात्री ११.५० च्या सुमारास हे पथक चंपा चौक येथे पोचले. येथे रिज पेट शॉपसमोर वाहनांची मोठी गर्दी दिसून आली. चालकाने ग्राहकांसाठी वाहन पार्किंगची कोणतीही स्वतंत्र सोय न करता, ग्राहकांची वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी राहू दिली होती. फारुख पठाण फिरोज पठाण (वय २६ वर्षे, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड) विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
मध्यरात्री १२.०५ च्या सुमारास चंपा चौक येथे गस्त घालत असताना जमजम टी हाऊस येथे रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसून आली. हॉटेलचालकाने ग्राहकांसाठी पार्किंग व्यवस्था केली नसल्याने ग्राहकांची वाहने थेट रस्त्यावरच उभी होती. या प्रकरणी चौकशी करून हॉटेलचालक मुजीब खान उस्मान खान (वय ४८ वर्षे, रा. चंपा चौक) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत, म्हणजेच मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास हे पथक रोशनगेट येथील सीमा दूध डेअरीजवळ पोचले. लकी ज्युस सेंटर समोरही हाच प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले. ज्युस सेंटरचालक हुजेफ शेख मजहर शेख (वय २४ वर्षे, रा. दिल्लीगेट) यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला. पोलिस अंमलदार गजानन खार्डे यांच्या फिर्यादीवरून जिन्सी ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले.