चौथ्या दिवशीही कोंडीमुळे परभणीकरांचे हाल
---------------------------
-अतिक्रमणांचा विळखा; बेशिस्त चालक, राजकीय दबावामुळे शहराचा कोंडला श्वास
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १६ : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, सलग चौथ्या दिवशीही परभणीकरांचे हाल झाले. प्रमुख चौक, रस्ते आणि वाहतुकीचे कोंडीच्या हॉटस्पॉटवर सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या. वाहनचालकांची बेशिस्त, अस्ताव्यस्त पार्किंग, वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे शहरातील रस्त्यांवर अक्षरशः गोंधळ होता. विशेष म्हणजे, वाहतुकीचा हा बोजवारा उडालेला असताना वाहतूक शाखा आणि मनपा प्रशासन मात्र ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे परभणीकर संतप्त झाले आहेत.
शहरातील वाहतूक कोंडीमागे वाहतूक शाखेचे ढिसाळ नियोजन हे प्रमुख कारण असले, तरी रस्त्यांवर, गल्लीबोळांत वाढलेल्या अतिक्रमणांचा विळखाही तितकाच जबाबदार आहे. रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने, हातगाड्या, व्यावसायिकांचे अतिक्रमण, अरुंद रस्त्यांमुळे वाहनांना मार्ग काढणेही कठीण झाले. मात्र, या अतिक्रमणांवर कारवाईची वेळ आली की मनपा प्रशासनाची भूमिका मवाळ होते. अतिक्रमण हटाव मोहिमा केवळ कागदावरच राहतात की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील अनेक अतिक्रमणांना राजकीय वरदहस्त असल्याने अतिक्रमण हटविण्यासाठी अधिकारी पुढे सरसावले की राजकीय दबावाचा सामना करावा लागतो. परिणामी, कारवाईचा धाक उरलेला नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे फावले आहे. प्रशासनाच्या बोटचेप्या भूमिकेमुळे सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमणांचे साम्राज्य वाढत असून, त्याची किंमत मात्र सर्वसामान्य नागरिकांना मोजावी लागत आहे.
-----------
सुट्या संपल्या; प्रवाशांची गर्दी
दिवाळीचा सण नुकताच संपल्याने सुट्यांनंतर गावी जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. परिणामी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्याही रस्त्यांवर वाढली आहे. या परिस्थितीत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करणे, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती उलटच दिसून येत आहे.
-----------
यंत्रणांचे एकमेकांकडे बोट
वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा वेळ रस्त्यावरच वाया जात आहे. रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवांनाही अशा कोंडीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील रस्ते मोकळे ठेवणे, अतिक्रमणे हटविणे, वाहतुकीला शिस्त लावणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना एकमेकांकडे बोट दाखविण्यातच यंत्रणा धन्यता मानत असल्याचे चित्र आहे.
((चौकट)))
वाहतूक शाखा-मनपा निद्रिस्त
सलग चार दिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहूनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर नागरिकांनी दाद मागायची तरी कुणाकडे? परभणी शहराचा विकास तर दूरच, आहे त्या रस्त्यांवरून मोकळेपणाने प्रवास करण्याची सोयही प्रशासनाला करता येत नसेल, तर ही शहरासाठी दुर्दैवी बाब आहे. वाहतूक शाखा आणि महापालिका प्रशासनाने आता एकमेकांकडे बोट दाखविण्याऐवजी संयुक्त कारवाई करून अतिक्रमणांचा विळखा दूर करावा, वाहतुकीचे नियोजन करावे आणि नागरिकांना कोंडीतून मुक्त करावे, अशी संतप्त मागणी होत आहे.
----