तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
ब्लॅकमेलिंग, धमकीप्रकरणी ११ जणांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ३ : आर्थिक व्यवहारातून धमकी देणे आणि आईचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक त्रास दिल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे.
स्वस्तिक शिवाजी घंटे (वय २८, रा. श्रीकृष्णनगर, धाराशिव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ सुयश शिवाजी घंटे (वय ३०, रा. श्रीकृष्णनगर, धाराशिव) यांनी सोमवारी (ता. दोन) दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलिस ठाण्यात ११ संशयितांविरोधात अॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात पृथ्वीराज सिद्धेश्वर लोंढे, सौरभ सिद्धेश्वर लोंढे (दोघे रा. सुभेदार नगर, धाराशिव), विराज देवानंद झेंडे (रा. खानापूर, ह.मु. हनुमान चौक, बार्शी रोड, धाराशिव), बंटी हर्षद बनसोडे, हर्षद बनसोडे (दोघे रा. भीमनगर, धाराशिव), श्रीनिवास शशिकांत मुंढे (रा. यशवंतनगर, धाराशिव), ऋतुराज अनुरथ नागटिळक (रा. शाहूनगर, धाराशिव), ऋषीकेश बप्पासाहेब ढवळे (रा. एमआयडीसी रोड, धाराशिव), अभिजित साखरे (रा. जिजाऊनगर, धाराशिव), शुभम गायकवाड (रा. कुरणेनगर, धाराशिव), प्रदीप वाघमारे आणि शुभम कांबळे (दोघे रा. शाहूनगर, धाराशिव) ही संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्तिक याने रविवारी (ता. २५) सकाळी राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आरोपींनी स्वस्तिक याच्याशी असलेल्या आर्थिक व्यवहारातून तसेच त्याच्या आईचे छायाचित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन तीव्र मानसिक त्रास व धमकी दिली. या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून स्वस्तिक याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद आहे.