कचरा वाहतूक प्रकरणात चोरीची कलमे वाढविण्याची मागणी
---
कंत्राटदार, सहआयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी १४ नगरसेवकांचे निवेदन
----
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. २४ : महापालिकेच्या कचरा वाहतूक प्रकरणात चोरीची कलमे वाढवून कंत्राटदार, सहआयुक्त, स्वच्छता विभागप्रमुख आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी लोकन्याय विकास आघाडीच्या १४ नगरसेवकांनी पोलिसांकडे केली. तपासात पुरावे आढळल्यास संबंधितांना सहआरोपी करावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.
२१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री कचऱ्याची वाहतूक करणारी दोन हायवा वाहने पकडली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली.
या प्रकरणात वजनकाट्याच्या नोंदी, सीसीटीव्ही चित्रण, वाहनांची जीपीएस माहिती, गेटपास आणि कंत्राटदाराला अदा करण्यात आलेल्या देयकांची तपासणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कचरा वाहतुकीच्या नोंदी आणि प्रत्यक्ष वाहतूक यांची पडताळणी करून आर्थिक अनियमितता किंवा फसवणूक झाल्याचे आढळल्यास दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, असे नगरसेवकांनी म्हटले आहे. या प्रकरणातील सर्व संबंधित पुरावे तपासून जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनावर राहुल सोनसले, ॲड. शेख बिलाल, शेख उम्मे आयमन सय्यद रिजवान, सय्यद शोएब, मोहसीन खान, सुनीता रूपक जोंधळे, सत्यपाल सावंत, महजाबिन बेगम अब्दुल फहीम, परवीन बेगम शेख पाशा, शेख बाबू भाऊ खोकेवाले, आफिया नाज नाफे काझी, मुन्ना अब्बास हुसेन, ज्योती रमेश गोडबोले आणि हलिमा बी शेख बाबू यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, संबंधित प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असून, पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.