ग्राउंड रिपोर्ट
----
पान १ लीड ABD26J79928
----
जायचे तर जा, नाहीतर दुसरी गाडी बघा
ट्रॅव्हल्स चालकांची अरेरावी; प्रवाशांच्या खिशावर उघड दरोडा
----
बीड-पुणे-मुंबई प्रवासाचे तिकीट थेट दुप्पट, प्रशासन करतेय काय?
पाचशेचे तिकीट थेट बाराशेवर; चाकरमान्यांच्या आनंदावर ट्रॅव्हल्स चालकांचे विरजण
----
नितीन चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. २१ ः मी पुण्यात एका खासगी कंपनीत जेमतेम दहा हजारांची नोकरी करतो. वर्षभर हाडाची काडं करून सणाला बायको-पोरांना घेऊन गावी, आपल्या बीडला जायचं म्हणजे आमच्यासाठी एक मोठा आनंदाचा क्षण असतो. पण, हाच आनंद आता या ट्रॅव्हल्सवाल्यांनी अक्षरशः हिरावून घेतलाय. काल मी तिकीट काढायला गेलो, तर नेहमी जे ५०० रुपयांचे तिकीट असते, ते थेट १२०० रुपये सांगण्यात आले. कुटुंबातील चार माणसांचे नुसते जाण्याचे पाच हजार रुपये लागतील. एवढे पैसे कुठून आणायचे? एसटी बसमध्ये पाय ठेवायला जागा नसते, एसटीचे बुकिंग महिनाभर आधीच फुल्ल झालेले असते. याचाच थेट गैरफायदा हे खासगी ट्रॅव्हल्सवाले घेतात. पैसे द्या, नाहीतर दुसरी गाडी बघा, अशी उद्धट उत्तरे त्यांच्या एजंटकडून ऐकावी लागतात. सणाला घरी जाऊन चार घास सुखाचे खावे, तर प्रवासातच आमचं दिवाळं निघतंय. गोरगरिबांनी सण साजरे करायचेच नाहीत का? मायबाप सरकार आणि अधिकारी या उघड लुटीवर गप्प का आहेत? ही अत्यंत प्रातिनिधिक आणि विदारक व्यथा आहे, बीड जिल्ह्यातून कामानिमित्त पुण्या-मुंबईत गेलेल्या हजारो सामान्य चाकरमान्यांची! सण-उत्सवाच्या तोंडावर ट्रॅव्हल्स चालकांच्या या दरोडेखोरीमुळे सर्वसामान्यांचे डोळे पाणावले आहेत.
सण-उत्सवाचे दिवस जवळ आले, की परगावी नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त राहिलेल्या चाकरमान्यांचे डोळे आपसुकच आपल्या गावाकडच्या वाटेकडे लागतात. मराठवाड्यातून आणि विशेषतः बीड जिल्ह्यातून पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये रोजगारासाठी स्थलांतर केलेल्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. सणाच्या या उत्साहावर विरजण घालण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी मात्र पुन्हा एकदा आपली बेकायदेशीर वसुलीची दुकाने थाटली आहेत. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी अशा मोठ्या सणांच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा थेट गैरफायदा घेत बीडमधील खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी बस भाड्यात तब्बल दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. बीड ते पुणे आणि बीड ते मुंबई या प्रमुख मार्गांवर प्रवाशांची उघडपणे आर्थिक लूट सुरू असून, या सर्व दरोडेखोरीकडे बीड प्रादेशिक परिवहन कार्यालय जाणीवपूर्वक काणाडोळा करत असल्याचा संतप्त आरोप आता सामान्य नागरिकांमधून होत आहे. सण-उत्सवाच्या काळात एसटी महामंडळाच्या गाड्यांची अपुरी पडणारी संख्या आणि महिला सन्मान योजनेमुळे एसटीतील प्रचंड गर्दी, याचा थेट फायदा खासगी ट्रॅव्हल्सचे मालक आणि त्यांचे एजंट उचलत आहेत.
एरवी अत्यंत वाजवी दरात चालणाऱ्या या ट्रॅव्हल्सनी आता प्रवाशांच्या खिशावर थेट दरोडा टाकण्यास सुरवात केली आहे. सामान्य दिवसांत बीडवरून पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्सचे तिकीट ४०० ते ५०० रुपये असते. मात्र, सध्या सणाच्या गर्दीचा गैरफायदा घेत हेच भाडे थेट १ हजार ते १ हजार २०० रुपयांपर्यंत उकळले जात आहे. बीड ते मुंबई दरम्यान नेहमीचे भाडे ८०० रुपये असताना, सध्या ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपये वसूल करत आहेत. कुटुंबासह सणाला गावी जाणाऱ्या सामान्य प्रवाशाला आता केवळ प्रवासासाठीच आपला खिसा पूर्णपणे रिकामा करावा लागत आहे. पुणे आणि मुंबईत रोजंदारीवर मजुरी करणारे, खासगी कंपन्यांमध्ये तुटपुंज्या पगारावर काम करणारे किंवा उच्चशिक्षण घेणारा बीड जिल्ह्यातील मोठा वर्ग सणासाठी आवर्जून गावी येतो. वर्षातून मोजून एकदा किंवा दोनदा येणाऱ्या या सणांसाठी चाकरमानी आवर्जून गावी पोचण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या मार्गात ट्रॅव्हल्सवाल्यांची ही लूट मोठी अडचण ठरत आहे.
ट्रॅव्हल्सवाल्यांनी आकारलेल्या या अवाढव्य तिकिटांमुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे पूर्ण बजेट कोलमडले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी ऑनलाइन बुकिंग ॲपवर अचानक तिकिटांचे दर वाढवून ठेवले आहेत. दुसरीकडे, ट्रॅव्हल्स पॉइंट्सवर उभे असलेले एजंट्स स्वतःच्या मर्जीने तोंडी भाडे सांगून चढ्या दराने तिकिटे विकत आहेत. जादा भाडे देण्यास प्रवाशांनी नकार दिल्यास ‘गाडीत जागा नाही, जायचे असेल तर या नाहीतर निघून जा’ अशी अरेरावीची भाषा या ट्रॅव्हल्स चालकांकडून आणि त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या एजंट्सकडून सर्रास वापरली जात आहे.
-------
नियम धाब्यावर; आरटीओ प्रशासनाचे अभय का?
शासकीय नियमांनुसार खासगी ट्रॅव्हल्स चालकांना एसटी महामंडळाच्या भाड्यापेक्षा कमाल ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाडेवाढ कोणत्याही परिस्थितीत करता येत नाही. जर यापेक्षा जास्त तिकीट दर आकारले जात असतील, तर संबंधित ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करणे आणि त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे स्पष्ट आदेश राज्य शासनाचे आहेत. मात्र, बीड कार्यालयातील अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहेत. उघडपणे सुरू असलेल्या या महालुटीकडे आरटीओचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचालक आणि आरटीओ अधिकाऱ्यांचे काही आर्थिक साटेलोटे तर नाही ना, असा थेट संशय आता प्रवासी व्यक्त करत आहेत.
-----
कोट
आम्ही पुण्यात साध्या नोकरी करतो. वर्षातून दोनवेळा सणासाठी गावी येण्याची इच्छा असते. पण, ५०० रुपयांचे तिकीट थेट हजार-बाराशे रुपये केले जात असेल, तर पूर्ण कुटुंबाचा प्रवासाचा खर्च चार-पाच हजारांच्या पार जातो. सणाचा आनंद ट्रॅव्हल्सवाल्यांच्या या लुटीमुळे पूर्णपणे हिरवला जातोय.
- अक्षय भांगे, नोकरदार, पुणे-बीड प्रवासी
--------
सणाच्या काळात एसटी बस फुल्ल असतात आणि रेल्वे नसल्याचा गैरफायदा हे ट्रॅव्हल्सवाले घेतात. जर जादा भाड्याबद्दल विचारणा केली तर ट्रॅव्हल्सचे एजंट जायचे असेल तर या, नाहीतर दुसरी गाडी बघा अशी अरेरावीची भाषा वापरतात. सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा?
- राहुल मस्के, विद्यार्थी, प्रवासी
-----
आरटीओ कार्यालयामार्फत विशेष तपासणी पथके
या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना बीडचे आरटीओ बालाजी धनवे म्हणाले, नियमानुसार एसटी महामंडळाच्या भाड्यापेक्षा ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाडेवाढ करण्यास ट्रॅव्हल्सचालकांना सक्त मनाई आहे. प्रवाशांची होणारी अडवणूक व लूट रोखण्यासाठी आरटीओ कार्यालयामार्फत विशेष तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. ट्रॅव्हल्स पॉइंट्सवर अचानक धाडी टाकून तिकिटांच्या दरांची पाहणी केली जाईल. कोणत्याही ट्रॅव्हल्सने जादा भाडे उकळल्यास किंवा प्रवाशांशी गैरवर्तन केल्यास प्रवाशांनी थेट आरटीओ कार्यालयाकडे तक्रार करावी, दोषींवर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.