आदिवासींना मिळणार
विविध योजनांचा लाभ
-------------
बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहात उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता.८ ः भगवान बिरसा मुंडा गौरव दिवसानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासह शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक सक्षमीकरणाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सेवा सप्ताहात १३ नोव्हेंबर रोजी पात्र लाभार्थ्यांना न्यूक्लियस बजेटअंतर्गत धनादेश वितरण, तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ दिले जातील. महिला बचत गट, स्वयंरोजगार व कृषिपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येईल. १४ नोव्हेंबरला आदिवासी स्मारकांची स्वच्छता व दीपोत्सव, तर १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे देशस्तरीय मुख्य कार्यक्रम होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. १६ नोव्हेंबरला आधार, वनपट्टे व शासकीय योजनांसाठी विशेष सेवा शिबिरे, १७ नोव्हेंबरला आरोग्य व सिकलसेल तपासणी शिबिरे आयोजित केली जातील. १८ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जात वैधता, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार व आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाला शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देत सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.
-------------------