Aurangabad | नामांकित कंपन्यांच्या बनावट साहित्य विक्री करणाऱ्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : नामांकित कंपन्यांच्या बनावट साहित्य विक्री करणाऱ्या त्रिकुटाला ठोकल्या बेड्या

औरंगाबाद : नामांकित कंपन्यांच्या बनावट साहित्य विक्री करणाऱ्या...

औरंगाबाद : झंडू बाम, डेटॉल साबण, हारपिक यासारखे साहित्‍य बनावट पद्धतीने तयार करून विक्री करणाऱ्या रिक्षाचालकासह तिघांना सिटी चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सदर आरोपींनी शहरात अनेक ठिकाणी बनावट माल विकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अक्षय लक्ष्मण जाधव (२४, रा. सिडको महानगर), शेख मोईज शेख मोहसीन (२९, रिक्षाचालक रा. संजयनगर गल्ली क्रमांक ११, बायजीपुरा), सय्यद मोहसीन मीर सय्यद सादात मीर (रा. बीड बायपास) अशी आरोपींची नावे आहे. यासंदर्भात जोगेश्वरी मुंबईतील अनुप कोलप (४४) यांनी त्यांच्या अधिपत्याखाली येत असलेल्या कंपनीचा झेंडू बाम तसेच इतर कंपनीचे डेटॉल साबण, तसेच हारपिक, साबळे वाघिरे कंपनीच्या विड्या आदी माल हा बनावट तयार करून सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत विक्री होत असून त्यासंदर्भात कारवाई करण्याची विनंती औरंगाबाद पोलिस आयुक्तांना केली होती.

दरम्यान, सिटी चौक पोलिस ठाण्याचे अधिकारी, कंपनीचे अधिकारी, उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांच्या पथकाने तपास केला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साठे चौकात लोडिंग ॲपेरिक्षासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. संशयितांकडून २९ हजार ८३० रुपयांच्या मालासह रिक्षा असा १ लाख १९ हजार ८३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तपासादरम्यान अक्षय जाधव याने सदरचा बनावट माल हा सय्यद मोहसीन मीर सय्यद सादात मीर (रा. बीड बायपास) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगून तो शहरात अशा प्रकारे नामांकित कंपनीचा माल अनेकांना विक्री करीत असल्याचे पोलिसांना सांगितले.

शहरात अनेक ठिकाणी बनावट माल विकल्याची शक्यता

उपनिरीक्षक गांगुर्डे यांच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी पथकासह सय्यद मोहसीन याला मोंढा नाका परिसरातून ताब्‍यात घेत त्याची झडती घेतली. दरम्यान त्याच्याकडे ९ हजार ४९० रुपयांचा साबळे वाघिरे कंपनीच्या विड्यांचा माल जप्त करण्यात आला आला. पोलिसांनी आतापर्यंत १ लाख २९ हजार ३२० रुपयांचा माल जप्त केला आहे. सिटी चौक ठाण्याच्या हद्दीसह औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर नामांकित कंपनीचा बनावट माल मिळण्याची शक्यता निरीक्षक अशोक गिरी यांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई उपनिरीक्षक गांगुर्डे, देशराज मोरे यांच्यासह कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांच्या पथकाने केली.

loading image
go to top