ट्रक अडवून मागितली खंडणी
नळदुर्ग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा
धाराशिव, ता. १७ : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पवनचक्कीचे पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकसमोर जीप आडवी लावून पुढे जाऊ देण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात चार तरुणांविरुद्ध खंडणी व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनीत सोहमीरसिंग तवार (वय २२, मूळ रा. तिंगडाना, ता. भवानीखेडा, जि. भिवानी, हरियाणा; सध्या रा. खसगी, ता. उमरगा) हे कंपनीच्या पवनचक्कीचे पाईप घेऊन ट्रकद्वारे जात होते. सोमवारी (ता. १६) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील फुलवाडी टोलनाक्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ चार जणांनी त्यांची जीप ट्रकसमोर आडवी लावली. संशयित आरोपींनी ट्रक थांबवून फिर्यादी विनीत तवार यांना ‘कंपनीच्या गाड्या पुढे जाऊ द्यायच्या असतील तर पैसे द्या, नाहीतर तुम्हाला येथून जाऊ देणार नाही, अशी दमदाटी करीत पैशांची मागणी केली. या प्रकारानंतर तवार यांनी नळदुर्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मृणाल सोमनाथ कांबळे, शशिकांत मालू देडे (दोघे रा. काटगाव, ता. तुळजापूर), अक्षय नंदकुमार कांबळे (रा. गरुड चौक, लातूर) आणि कुणाल हणमंत गोरे (वय १९, रा. मोतीनगर, मुरूड, ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.