(दीपोत्सव लेख)
सणाचा थाट वाढला; नात्यांचा गोडवा कमी झाला
---------
दिवाळी म्हटले, की डोळ्यांसमोर उभे राहतात ते बालपणीचे दिवस, अंगणातील रांगोळी, मातीच्या पणत्यांचा मंद प्रकाश, पहाटेचा अभ्यंगस्नानाचा उत्साह, घराघरांतून दरवळणारा फराळाचा सुगंध आणि नातेवाइकांच्या भेटीगाठी. दिवाळी हा केवळ दिव्यांचा किंवा रोषणाईचा सण नव्हता, तर माणसांना एकत्र आणणारा, नाती जपणारा आणि आनंदाची देवाणघेवाण करणारा उत्सव होता. मात्र, काळ बदलला आणि त्यासोबत दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीही बदलल्या. आज दिवाळी अधिक आधुनिक, आकर्षक आणि खर्चिक झाली असली, तरी पूर्वीच्या दिवाळीतील साधेपणा आणि आपलेपणाची ऊब कुठेतरी हरवत चालल्याची भावना अनेकांच्या मनात आहे.
- योगेश बरीदे, परतूर
----
पूर्वी दिवाळीची तयारी अनेक दिवस आधीपासून सुरू व्हायची. घराची स्वच्छता, भिंतींना रंग देणे, अंगण सारवणे, रांगोळी काढणे आणि आकाशकंदील तयार करणे या कामांत संपूर्ण कुटुंब सहभागी व्हायचे. लहान मुले कागदाचे आकाशकंदील बनवायची. घरासमोर रंगीबेरंगी रांगोळी आणि मातीच्या पणत्यांची आरास असायची. त्या पणत्यांचा प्रकाश मनाला वेगळाच आनंद देत असे. आज मात्र, बाजारात तयार आकाशकंदील, आकर्षक एलईडी दिव्यांच्या माळा, इलेक्ट्रॉनिक सजावट आणि विविध प्रकारच्या रोषणाईने बाजारपेठ सजलेली दिसते. घरांची सजावट अधिक आधुनिक झाली आहे. मात्र, पूर्वी कुटुंबातील सर्वांनी मिळून केलेल्या तयारीतून निर्माण होणारा आनंद आजच्या तयार सजावटीत तितकासा अनुभवायला मिळत नाही. पूर्वी दिवाळीच्या फराळाला विशेष महत्त्व होते. चकल्या, करंज्या, लाडू, चिवडा, शंकरपाळे, अनारसे असे पदार्थ घरातील महिला एकत्र येऊन बनवत असत. शेजारी-पाजारी फराळाची देवाणघेवाण व्हायची. कोणाच्या घरी कोणता पदार्थ चांगला झाला, याची चर्चा रंगायची. फराळाच्या निमित्ताने संवाद वाढायचा आणि आपुलकीची नाती अधिक घट्ट व्हायची. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात अनेकांकडे फराळ बनविण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे तयार फराळ, मिठाई आणि आकर्षक भेटवस्तू खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. ऑनलाइन ऑर्डर आणि घरपोच सेवांमुळे खरेदी सोपी झाली आहे. मात्र, स्वतःच्या हाताने बनवलेल्या पदार्थांतून व्यक्त होणारे प्रेम आणि जिव्हाळा यांची जागा केवळ खरेदी केलेल्या वस्तूंनी घेता येत नाही. पूर्वी दिवाळीच्या सुटीत लहान मुलांसाठी किल्ले बनवणे हा मोठा आनंदाचा भाग होता. माती आणून किल्ल्याची उभारणी करणे, त्यावर मावळे, घोडे, तोफा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवणे, यासाठी मुलांमध्ये चढाओढ लागायची. या उपक्रमातून मुलांना इतिहासाची ओळखही व्हायची. संध्याकाळी मित्रांसोबत खेळणे आणि फटाके फोडणे यासाठी मुलांचा उत्साह ओसंडून वाहत असे.
आजही किल्ले बनविण्याची परंपरा काही ठिकाणी जपली जाते. मात्र, मोबाइल गेम, टीव्ही आणि डिजिटल मनोरंजनामुळे मुलांचा मैदानी खेळांकडे असलेला ओढा कमी झाल्याचे चित्र दिसते. एकाच घरात राहूनही प्रत्येक जण आपापल्या मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. पूर्वी दिवाळीत नातेवाइकांच्या घरी प्रत्यक्ष जाणे, मोठ्यांचे आशीर्वाद घेणे, मित्रांना भेटणे आणि शेजाऱ्यांच्या घरी फराळासाठी जाणे, ही आनंदाची परंपरा होती. दिवाळीनिमित्ताने दूर गेलेली माणसेही एकत्र यायची. घरातील ज्येष्ठ मंडळी जुन्या आठवणी सांगायची आणि नव्या पिढीला त्या ऐकण्याची संधी मिळायची. आता व्हॉट्सॲप संदेश, व्हिडिओ कॉल, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचे प्रमाण वाढले आहे. एका क्लिकवर शेकडो लोकांना शुभेच्छा पाठविता येतात. तंत्रज्ञानामुळे अंतर कमी झाले असले, तरी प्रत्यक्ष भेटीगाठींचे प्रमाण कमी होताना दिसते. शुभेच्छांचे संदेश वाढले, पण मनमोकळ्या गप्पांसाठीचा वेळ कमी झाला, ही बदलत्या काळाची वस्तुस्थिती आहे. पूर्वी मर्यादित साधनांमध्येही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जायची. नवीन कपडे, थोडेफार फटाके आणि घरगुती फराळ एवढ्यातही कुटुंबाचा आनंद पूर्ण व्हायचा. आज दिवाळीच्या खरेदीला मोठे व्यावसायिक स्वरूप आले आहे. कपडे, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, घरगुती उपकरणे आणि महागड्या भेटवस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले जाते. जाहिराती आणि आकर्षक सवलतींमुळे खरेदीची स्पर्धाही वाढली आहे. परिणामी, काही कुटुंबांसाठी दिवाळीचा आनंद आर्थिक नियोजन आणि खर्चाच्या चिंतेत अडकताना दिसतो. काळानुसार बदल होणे स्वाभाविक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, बदलती जीवनशैली आणि सोयी-सुविधा यांचा स्वीकार करणे चुकीचे नाही. पर्यावरणपूरक दिवाळी, ध्वनी प्रदूषण टाळणे, गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देणे, हीदेखील आजच्या काळाची गरज आहे.
मात्र, या बदलांच्या प्रवासात दिवाळीचा मूळ हेतू विसरता कामा नये. घरातील ज्येष्ठांना वेळ देणे, मुलांसोबत किल्ला तयार करणे, स्वतःच्या हाताने थोडाफार फराळ बनविणे, शेजाऱ्यांना भेटणे आणि गरजू कुटुंबांसोबत आनंद वाटून घेणे, या छोट्या गोष्टींमधूनच दिवाळीचा खरा आनंद मिळतो. आज दिवाळीला रोषणाई वाढली, खरेदी वाढली, शुभेच्छांचे संदेश वाढले; पण माणसांमधील संवाद आणि एकत्र घालवलेला वेळ कमी होत चालला आहे का, हा विचार करण्याची वेळ आली आहे. दिवाळीचा खरा प्रकाश घरातील विद्युत दिव्यांमध्ये नसून माणसांच्या मनातील आपुलकीत आहे. पूर्वीची दिवाळी पुन्हा तशीच अनुभवता येणार नाही, पण तिच्यातील साधेपणा, जिव्हाळा आणि माणुसकी आजही जपता येऊ शकते. शेवटी, दिवाळी मोठी करण्यासाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही; तर मन मोठे करण्याची गरज आहे. कारण दिवाळीचा खरा आनंद वस्तूंच्या खरेदीत नसून माणसांच्या सहवासात, नात्यांच्या गोडव्यात आणि एकमेकांच्या आयुष्यात आनंदाचा दिवा लावण्यात आहे.