तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
३३ प्रथमोपचार केंद्रे, २३ रुग्णवाहिका कार्यरत; हजारो भाविकांवर उपचार
धाराशिव, ता. १४ (बातमीदार) : तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. यात्रा मार्गांवर ३३ प्रथमोपचार केंद्रे, २३ रुग्णवाहिका, साथरोग प्रतिबंधक पथके आणि फिरते आरोग्य पथक कार्यरत करण्यात आले आहे. मंदिरात अतिदक्षता कक्ष, तर उपजिल्हा रुग्णालयात सहा खाटांचे विशेष रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत दोन हजार ८५९ भाविकांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे.
रविवारपासून (ता. ११) नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने शनिवारपासूनच आरोग्य यंत्रणा कार्यान्वित केली आहे. धाराशिव, लातूर, सोलापूर, नळदुर्ग, लोहारा, उमरगा तसेच कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांसाठी विविध मार्गांवर २४ तास सेवा देणारी २२ प्रथमोपचार केंद्रे, तर शहरात ११ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर औषधसाठ्यासह आरोग्य कर्मचारी तैनात आहेत.
यात्रा मार्गांवरील ग्रामीण आणि शहरी भागांत प्रत्येकी १० साथरोग प्रतिबंधक पथके कार्यरत आहेत. या पथकांमार्फत पाणीपुरवठ्याचे स्रोत, पाणीसाठे, हॉटेल, ढाबे आणि लॉजमधील पाण्याची तपासणी केली जात आहे. दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याची पुन्हा तपासणी केली जात आहे.
तुळजापूरकडे येणाऱ्या सहा मार्गांवर १० बाईक रुग्णवाहिका तैनात आहेत. याशिवाय १०२ क्रमांकाच्या १२ आणि १०८ क्रमांकाच्या ११ रुग्णवाहिका सज्ज आहेत. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर दोन खाटांचा अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांसह सहा खाटांचे रुग्णालय २४ तास सेवा देत आहे. शहरात १० आरोग्यदूत प्रथमोपचार संचासह कार्यरत असून, ते पायी फिरून भाविकांना आरोग्यसेवा देण्याबरोबरच जनजागृती करत आहेत. रुग्णालयात नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आला आहे.