अँकर ((जागर आदिशक्तीचा))
--
ABD26J81738 तुळजाभवानी देवी.
----
तुळजाभवानीच्या भक्तीचा घोट्यामध्ये जागर!
------
दीडशे वर्षांची परंपरा; नवरात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी
----
हिंगोली, ता. १९ : तालुक्यातील घोटादेवी येथील श्रीक्षेत्र तुळजादेवी मंदिर हे भाविकांच्या अढळ श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. सुमारे १५० वर्षांपासून धार्मिक परंपरेत वसलेल्या या मंदिरात तुळजादेवीने स्वतः येऊन एका भक्ताला दर्शन दिल्याची आख्यायिका आहे. मराठवाडा आणि विदर्भासह राज्याच्या विविध भागांतील भाविक दर्शनासाठी या मंदिराला भेट देतात. विशेषतः सध्या नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
श्री तुळजादेवी मंदिर संस्थानने यावर्षीही शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे. मंदिरात दररोज धार्मिक कार्यक्रम पार पडत असून, यामध्ये देवीची पूजा, दुर्गा सप्तशतीचे पठण आणि विशेष धार्मिक विधी केले जात आहेत. ११ ऑक्टोबरला मंदिरात घटस्थापना झाली. त्यानंतर १२ ऑक्टोबरला श्री महापूजा व दुर्गा सप्तशतीचे पठण, १५ ऑक्टोबरला ललिता पंचमीनिमित्ताने विशेष धार्मिक कार्यक्रम पार पडला. तसेच २० ऑक्टोबरला महानवमीनिमित्ताने विशेष प्रार्थना आणि श्री महाभिषेक करण्यात आला. याशिवाय विजयादशमीनिमित्त देवी तुळजादेवीची मिरवणूक काढण्यात आली. विजयादशमीच्या दिवशी येथे दिवसभरात हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होण्याची शक्यता असून, या अनुषंगाने संस्थानच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, घोटा येथील श्री तुळजादेवी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ तसेच देवीप्रती भक्तांच्या अढळ श्रद्धेची आणि भक्तीची परंपरा म्हणूनही ओळखले जाते.
----
मंदिराचा कारभार प्रशासनाच्या नियंत्रणात
श्री तुळजादेवी मंदिर १९९१ पासून प्रशासनाच्या नियंत्रणाखाली आहे. मंदिराचे धार्मिक कार्यक्रम, व्यवस्था आणि उत्सवाची जबाबदारी श्री तुळजादेवी मंदिर संस्थेची आहे. संस्थाध्यक्ष हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ आहेत. मंदिर संस्थानच्या कार्यकारी समितीत १६ सदस्य आहेत, ज्यात हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे, साहेबराव पाटील गोरेगावकर, अतुल दातार, राजाभाऊ देशमुख, वकील नंदकिशोर मुंदडा, अनंतराव पांडे, वकील किरण नर्सीकर, मारुतीराव बुद्रुक पाटील, डॉ. मुरलीधर तोष्णीवाल, वकील कैलास कोटकर, विष्णुनारायण काबरा, किसन गवांदे व अद्वैत मुळे यांचा समावेश आहे.
-----
अशी आहे आख्यायिका...
केशवराव देशमुख हे माता तुळजादेवीचे भक्त होते. ते दर महिन्याला तुळजापूर येथील देवी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत. नवरात्रीच्या काळात ते नऊ दिवस तुळजापूरमध्ये राहून श्रद्धेने देवीची पूजा करत. वाढत्या वयामुळे केशवराव थकत गेले, तशी त्यांची पायी यात्रा कठीण होत गेली. वृद्धापकाळामुळे त्यांना देवी दर्शनासाठी तुळजापूरला जाणे अशक्य झाले. त्यांना सतत देवीचे दर्शनाची इच्छा होत असे. एकेदिवशी तुळजादेवी त्यांच्या स्वप्नात आली. तिने त्यांना आश्वासन दिले, की आता त्यांना दर्शनासाठी तुळजापूरला जाण्याची गरज नाही, देवी त्यांना घोटा येथेच दर्शन देईल. त्यानंतर, केशवरावांना देवीच्या प्रकटीकरणाचे चिन्ह मिळाले. जिथे देवी प्रकट होते असे मानले जाते, त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. यानंतर, केशवराव देशमुखांनी त्याच ठिकाणी देवी तुळजादेवीची पूजा करण्यास सुरवात केली. तेच हे आजचे तुळजादेवी मंदिर.