हळदीने गाठला २० हजारांचा टप्पा
----
नांदेडच्या बाजारपेठेत प्रतिक्विंटल २० हजार रुपये दर
-----
नांदेड, ता. ९ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारपेठेत हळदीच्या दराने पुन्हा मोठी झेप घेतली आहे. बुधवारी आणि गुरुवारी हळदीला प्रतिक्विंटल २० हजार ते २० हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मात्र, हंगामात हळदीची आवक मोठ्या प्रमाणात असताना कमी दराने विक्री केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना या तेजीचा लाभ मिळालेला नाही. शेतकऱ्यांकडील हळदीचा साठा संपत आल्याने वाढलेल्या दराचा फायदा व्यापाऱ्यांना अधिक होत असल्याचे चित्र आहे.
हळदीच्या हंगामात बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होत असताना शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १४ ते १५ हजार रुपयांपर्यंतच भाव मिळत होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध हळदीची विक्री केली. आता बाजारातील आवक घटली असून, शेतकऱ्यांकडील हळदीचा साठाही कमी झाला आहे. परिणामी, मागणी आणि उपलब्धतेतील बदलामुळे दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या हळदीच्या गुणवत्तेनुसार दरात मोठी तफावत आहे. कमी गुणवत्तेच्या हळदीला प्रतिक्विंटल सुमारे १६ हजार रुपये, मध्यम प्रतीच्या हळदीला १७ हजार रुपयांपर्यंत, तर उत्तम गुणवत्तेच्या हळदीला २० हजार ते २१ हजार रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. त्यामुळे दर्जेदार हळदीला बाजारात विशेष मागणी असल्याचे स्पष्ट होत आहे.
-----
साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना संधी
हंगामात कमी भाव मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी हळदीची विक्री न करता साठवणूक केली होती. अशा मोजक्या शेतकऱ्यांना सध्याच्या दरवाढीचा फायदा मिळत आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांचा शेतमाल यापूर्वीच विकला गेल्याने वाढलेल्या दराचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही.