उत्पादनात घट, मात्र बाजारभावात तेजी
----
हळदीचा भाव २५ ते २२ हजारांवर; साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा
-----
जळकोट, ता. १६ (शहर बातमीदार) ः कधी काळी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरलेली हळद यंदा पुन्हा एकदा चांगल्या दरामुळे चर्चेत आली आहे. हळदीच्या बाजारभावात झालेल्या वाढीमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. सध्या हळदीला बाजारपेठेत साधारणपणे २२ ते २५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उत्पादन कमी असले, तरी वाढलेल्या बाजारभावामुळे झालेली आर्थिक कसर भरून निघण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
तालुक्यासह परिसरातील अनेक शेतकरी पारंपरिक पिकांसोबत हळदीचे उत्पादन घेतात. यंदा प्रतिकूल हवामान, पावसातील अनियमितता व उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे हळदीच्या उत्पादनावर परिणाम झाला. मात्र,
दुसरीकडे बाजारपेठेत हळदीला चांगली मागणी आणि वाढलेले दर यामुळे उत्पादकांना दिलासा मिळत आहे. हळदीच्या बाजारभावाचा विचार करून काही शेतकऱ्यांनी काढणीनंतर लगेचच हळदीची विक्री केली, तर अनेक शेतकऱ्यांनी भविष्यात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने आपला माल वेअरहाऊसमध्ये साठविला. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी मागीलवर्षीची हळददेखील वेअरहाऊसमध्ये सुरक्षित ठेवली होती. आता बाजारभावात झालेल्या वाढीचा फायदा या साठवणूकदार शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आर्थिक अडचणींमुळे कर्जाची परतफेड, घरखर्च, शेतीचा वाढता खर्च आणि इतर गरजांसाठी काही शेतकऱ्यांना हळद कमी भावात विकावी लागली. आता हळदीला चांगला भाव मिळत असल्याने आधीच विक्री केलेल्या शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. आर्थिक परिस्थितीमुळे माल
कमी उत्पादनाची भरपाई वाढलेल्या भावातून यंदा हळदीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी असले, तरी बाजारभावाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
---
चांगल्या दरामुळे उत्पादकांना समाधान
हळद लागवडीपासून काढणीपर्यंत मशागत, खते, औषधे, मजुरी, पाणी आणि प्रक्रियेवर मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे उत्पादन कमी झाल्यानंतर चांगला बाजारभाव मिळणे ही उत्पादकांसाठी समाधानाची बाब ठरत आहे. एकीकडे सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या बाजारभावाबाबत शेतकऱ्यांमध्ये असमाधान असताना हळदीच्या वाढलेल्या दराने मात्र काही प्रमाणात आर्थिक दिलासा दिला आहे. बाजारभावाबाबत बाजारपेठा महत्त्वाच्या ठरत आहेत. १३ नोव्हेंबरला बाजार समितीत हळदीला २१ हजार ३०० ते २५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलवर दर नोंदला गेला. सध्या बाजारात हळदीचे दर २२ ते २५ हजार रुपयांच्या आसपास पोचल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.