
औरंगाबाद : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास वीस वर्षे सक्तमजुरी
औरंगाबाद - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपी सुनील देविदास वाहूळ (वय २३, रा. औरंगाबाद) याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली. विशेष म्हणजे पीडित मुलगीच फितूर झाली होती. मात्र सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी न्यायालयाच्या परवानगीने पीडितेची उलट तपासणी केली त्यावेळी तिने घडलेल्या घटनेची कबुली दिली होती. प्रकरणात १४ वर्षीय पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, १७ मार्च २०१५ रोजी रात्री पीडिता ही गायब झाली होती. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी २० मार्च २०१५ रोजी जाधवमंडी येथून पीडितेला ताब्यात घेतले.
तिचा जबाब घेतला असता, तिने सांगितले की, आरोपी व पीडिता एकाच परिसरात राहणारे आहेत. त्यांच्यात प्रेम झाल्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून जवळीक निर्माण केली. त्यानंतर आरोपी हा पीडितेला अश्लील चित्रफीत दाखवून तसे कृत्य करायला सांगत होता. लग्न करणार असल्याने पीडितेने देखील त्यास सहमती दर्शवली होती. आरोपीने पीडितेशी बलात्कार व अनैसर्गिक कृत्य करताना मोबाइलमध्ये त्याचे चित्रण केले होते. १७ मार्च २०१५ रोजी आरोपी व पीडिता २० मार्च २०१५ रोजी पटेलनगर, पिसादेवी भक्तीनगरात फिरले. १९ मार्च २०१५ रोजी त्यांनी पिसादेवी परिसरातील एका दुकानातून ५० रुपयांचा मणीमंगळसूत्र घेतले व हर्सूल येथील हरसिद्धीमातेच्या मंदिरात लग्न केले. या प्रकरणात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांनी तपास केला. सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी सुनील वाहूळ याला दोषी ठरवले. त्याला पोक्सोच्या कलम ४ अन्वये २० सक्तमजुरी, २५ हजारांचा दंड, कलम ८ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी, ५ हजारांचा दंड, कलम १२ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, भादंवि कलम ३६३ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी ५०० रुपयांचा दंड, कलम ३७६ (२)(आय) अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात अॅड. शिरसाठ यांना अॅड. तेजस्विनी जाधव यांनी साहाय्य केले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार शेख रज्जाक यांनी काम पहिले.
Web Title: Twenty Years Servitude For Abusing A Minor Girl
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..