अँकर पान ३
--
उदगीर ग्रामीण हद्दीत आज १२५ गणरायांना निरोप
५४ गावांत पोलिस बंदोबस्त तैनात; ६० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
--
उदगीर, ता. १८ (बातमीदार) ः गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५४ गावांमध्ये तब्बल १२५ गणरायांना शुक्रवारी (ता. १७) निरोप दिला जाणार आहे. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामीण पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी विशेष नजर ठेवत व्यापक बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून ६० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तर सुमारे २०० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेशोत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईलाही सुरवात केली आहे. त्यानुसार ६० जणांवर कलम १०७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, जवळपास २०० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील ठिकाणी पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. गणेश मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, ध्वनिक्षेपकाचा वापर, मिरवणुकीचे मार्ग आणि विसर्जनाची वेळ याबाबतच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशी माहिती डीएसबी शाखेचे संतोष दुबळगुंडे यांनी दिली.
--
देवर्जनची वेगळी परंपरा
देवर्जन येथील ‘देवर्जनचा राजा’ गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीचे मंडळाच्या जागेवरच विसर्जन करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता शेवटच्या दिवशी महाप्रसाद करून जागेवरच विसर्जन करण्याची परंपरा देवर्जन गावाने जपली आहे.