उदगीर-जळकोट मार्गावरील एसटी
बससेवा बंद; विद्यार्थी, प्रवाशांचे हाल
---
जळकोट, ता. ६ (बातमीदार) ः गेल्या २५-३० वर्षांपासून सुरू असलेली उदगीर-जळकोट मार्गावरील वाढवणा-लाळी खु. एसटी बससेवा गेल्या तीन-चार महिन्यांपासून अचानक बंद करण्यात आल्याने १० ते १५ गावांतील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सकाळची सोयीची बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, अतिरिक्त खर्चासह पायपीट करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी होत असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळी ६ः१० वाजता उदगीरहून सुटणारी व जळकोटला पोचणारी ही बस अनेक विद्यार्थ्यांसाठी सोयीची होती. बस बंद झाल्याने वाढवणा, लाळी बु., बेळसांगवी, येवरी, डोंगरकोनाळी, मंगरूळ, सोनवळा, कोळनूर आदी गावांतील नागरिक व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. तसेच पायपीट करण्याची वेळ आली आहे. या मार्गावर लवकरात लवकर बससेवा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा परिषद सदस्य नागेश्वरी केंद्रे, पंचायत समिती सभापती सुनीता कोसंबे, पंचायत समिती सदस्य राजेश केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य धर्मपाल देवशेट्टे, काँग्रेसचे सचिन केंद्रे, माजी सरपंच महेताब बेग, अक्षय बडगिरे, प्रमोद दाडगे आदींनी दिला आहे. प्रवाशांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बससेवा सुरू करण्याच्या सूचना केल्या. तसेच माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन बससेवा सुरू करण्यात येईल, असे सांगितले.