उदगीरचे ध्वनिप्रदूषण धोकादायक श्रेणीत
------------
उदगीर, ता. १३ (बातमीदार) : यंदा दरवर्षीप्रमाणे पाऊस पडला असता, तर हवेतील धुळीचे प्रमाण कमी राहिले असते. मात्र, पाऊस कमी असतानाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने उदगीर शहरात हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण वाढल्याचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी व त्यांचे सहकारी रोशनी उगीले आणि मनोहर नावंदे यांनी लक्ष्मीपूजन ते दिवाळी पाडवा या तीन दिवसांत शहरातील विविध ठिकाणी सर्वेक्षण केले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक १०५ तर ध्वनी पातळी १२० डेसिबल नोंदवली गेली. दुसऱ्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक ११५ तर ध्वनी पातळी ११५ डेसिबल होती. दिवाळी पाडव्याच्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक १२५ वर पोचला, तर ध्वनी पातळी ११० डेसिबल इतकी होती. हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषण श्रेणीत असला तरी ध्वनिप्रदूषण अत्यंत धोकादायक श्रेणीत होते. ८५ डेसिबल पेक्षा जास्त आवाज हा कान आणि हृदयासाठी घातक मानला जातो. उदगीरमध्ये ११० ते १२० डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद झाली, ही बाब चिंताजनक आहे.
पावसाअभावी हवेतील प्रदूषक कण तसेच राहिल्याने लहान मुले, वृद्ध, दमा आणि हृदयरुग्णांना अधिक त्रास झाला. पर्यावरणशास्त्र विभागाने पुढील वर्षी कमी आवाजाचे फटाके वापरून आणि दिव्यांची रोषणाई करून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.