उदगीरमध्ये २ हजार ६६० शिधापत्रिका रद्द
---
अन्न सुरक्षा योजनेतून १३ हजार ६९० लाभार्थी वगळले, ‘मिशन सुधार’अंतर्गत छाननी
--
युवराज धोतरे
उदगीर, ता. २६ : केंद्र शासनाच्या ‘मिशन सुधार’ मोहिमेंतर्गत उदगीर तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शिधापत्रिकांची व्यापक पडताळणी करण्यात आली आहे. या छाननीत अन्न सुरक्षा योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरलेल्या २ हजार ६६० शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या असून, त्यावरील १३ हजार ६९० लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेच्या लाभातून वगळण्यात आले आहे. या लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका शुभ्र अर्थात पांढऱ्या प्रवर्गात वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील पांढऱ्या शिधापत्रिकांची संख्या २ हजार ७६३ वरून ५ हजार ४२३ झाली असल्याची माहिती तालुका पुरवठा निरीक्षक सुमित्रा इलमले यांनी दिली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून पात्र आणि गरजू कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, या योजनेचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा आणि अपात्र व्यक्तींना मिळणारा लाभ बंद व्हावा, या उद्देशाने शासनाकडून शिधापत्रिकांची पडताळणी करण्यात येत आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून उदगीर तालुक्यात ‘मिशन सुधार’अंतर्गत शिधापत्रिकांची तपासणी करण्यात आली.
नोंदींच्या आधारे पडताळणी
शिधापत्रिकाधारकांची आर्थिक स्थिती आणि त्यांची पात्रता तपासण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांकडील माहितीचा आधार घेण्यात आला. यामध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटी, वस्तू व सेवा कर विभाग (जीएसटी) तसेच महावितरण यांच्या नोंदींच्या आधारे लाभार्थ्यांची माहिती पडताळण्यात आली.
या तपासणीत प्राप्तीकर भरणारे, चारचाकी वाहनधारक, मोठा व्यवसाय करणारे तसेच शासनाने निश्चित केलेल्या पात्रता निकषांमध्ये न बसणारे लाभार्थी तपासणीच्या कक्षेत आले. त्यानंतर अपात्र ठरलेल्या शिधापत्रिका आणि लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्याची कार्यवाही करण्यात आली. या मोहिमेमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांची संख्या कमी झाली असली, तरी पात्र आणि आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.
तालुक्यात ५९ हजार शिधापत्रिका
‘मिशन सुधार’अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईनंतर उदगीर तालुक्यातील अंत्योदय अन्न योजनेत ४ हजार ५४७ शिधापत्रिका असून, त्यावर २१ हजार ६२१ लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेत ४७ हजार १५७ शिधापत्रिका असून, त्यावर २ लाख १६ हजार ६७८ लाभार्थी आहेत. एनपीएच प्रवर्गाच्या १ हजार ५४३ शिधापत्रिका असून, त्यावर ५ हजार १२४ लाभार्थी आहेत. केसरी शिधापत्रिका ५ हजार ७३४ असून, त्यावर २१ हजार ६३२ लाभार्थी आहेत. आकडेवारीनुसार, तालुक्यात एकूण ५९ हजार शिधापत्रिका आणि २ लाख ६५ हजार ८५५ लाभार्थी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पांढऱ्या शिधापत्रिकांमध्ये भर
‘मिशन सुधार’ मोहिमेपूर्वी उदगीर तालुक्यात २ हजार ७६३ पांढऱ्या शिधापत्रिका होत्या. मात्र, अन्न सुरक्षा योजनेतून २ हजार ६६० शिधापत्रिका वगळल्यानंतर त्यांची संख्या आता ५ हजार ४२३ झाली आहे. म्हणजेच, या मोहिमेमुळे पांढऱ्या शिधापत्रिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तर अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना यापुढे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीच्या धान्याचा लाभ मिळणार नाही.
कोट -----
केंद्र शासनाच्या ‘मिशन सुधार’ मोहिमेंतर्गत उदगीर तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेतील अपात्र लाभार्थी आणि शिधापत्रिकांची पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत २ हजार ६६० शिधापत्रिका आणि १३ हजार ६९० लाभार्थी वगळण्यात आले आहेत. यामुळे पात्र आणि गरजू लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
-सुमित्रा इलमले, पुरवठा निरीक्षण अधिकारी, उदगीर
------