रिअल इस्टेटमध्ये १५ लाखांपर्यंत मालमत्तांना पसंती
------------
उदगीर शहरात दिवाळाच्या पार्श्वभूमीवर चित्र, सध्या मोठ्या व्यवहारांना काहीसा ब्रेक
------
युवराज धोतरे
उदगीर, ता. ३ : लातूर जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदगीर शहर ओळखले जाते. उदगीर शहरातील जमीन, प्लॉट, फ्लॅट आणि घरांच्या खरेदी-विक्री व्यवहारांना दिवाळीच्या मुहूर्तावर तेजी असते. सध्या दुष्काळी परिस्थिती, शेतीच्या उत्पन्नात झालेली घट आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील आर्थिक चणचण यामुळे रिअल इस्टेटमध्ये १५ लाखांपर्यंत मालमत्तांना पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
दसरा आणि दिवाळी हे सण नवीन घर, प्लॉट, फ्लॅट किंवा रो-हाऊस खरेदी करण्यासाठी शुभमुहूर्त मानले जातात. त्यामुळे या कालावधीत रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल अपेक्षित असते. उदगीर शहरातही दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना वेग येतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. दुष्काळामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांच्या हातात पैसा कमी असल्याने मोठ्या मालमत्ता खरेदीचे निर्णय पुढे ढकलले जात आहेत.
उदगीर शहरातील रिअल इस्टेटचे दर अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. लातूर शहराच्या तुलनेत उदगीरमध्ये काही भागांतील प्लॉट आणि घरांचे दर अधिक असल्याची चर्चा होत असते. विशेष म्हणजे उदगीरमधील वाढत्या मालमत्ता दरांचा प्रश्न राज्याच्या विधिमंडळातही उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे उदगीरच्या रिअल इस्टेट बाजारपेठेची चर्चा राज्यभर झाली होती. सीमावर्ती भागातील व्यापारी उलाढाल, शेतमालाची मोठी बाजारपेठ, औद्योगिक व व्यावसायिक हालचाली आणि परिसरातील ग्रामीण ग्राहकांची मागणी यामुळे उदगीरच्या मालमत्ता बाजाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सध्या उदगीर शहरात सुमारे १५ लाख रुपयांपर्यंतच्या किमतीतील प्लॉट आणि घरांच्या खरेदीला तुलनेने पसंती मिळत आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक किमतीचे फ्लॅट, मोठे प्लॉट आणि रो-हाऊस खरेदी करण्यासाठी ग्राहक पुढे येत नसल्याचे चित्र आहे. आर्थिक परिस्थितीचा विचार करून ग्राहकांकडून मोठी गुंतवणूक टाळली जात आहे. अनेकजण मालमत्ता पाहणी आणि चौकशी करीत असले तरी प्रत्यक्ष व्यवहार करण्याबाबत सावध भूमिका घेत आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात उदगीर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. या परिसरातील शेतमालाची मोठ्या प्रमाणावर उदगीरच्या बाजारपेठेत आवक होते. शेतीमालाच्या खरेदी-विक्रीतून निर्माण होणारी आर्थिक उलाढाल ही उदगीरच्या व्यापारी अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. याच आर्थिक उलाढालीचा सकारात्मक परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावरही होत असतो. मात्र, यंदा अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. परिणामी बाजारपेठेतील शेतमालाची आवक आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढालही प्रभावित झाली आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याने घर, प्लॉट आणि फ्लॅट खरेदीसाठी आवश्यक असलेली गुंतवणूक करण्याची मानसिकता सध्या दिसून येत नाही.
--
उदगीरमधील मालमत्तांचे दर स्थिर
सध्या उदगीरमधील मालमत्तांचे दर स्थिर आहेत, तरिही खरेदीदारांची संख्या आणि प्रत्यक्ष व्यवहारांचे मोजके होत आहेत. आता दिवाळी-पाडव्याच्या मुहुर्तावर अनेकजण रिअल इस्टेट क्षेत्रातील खरेदीसाठी सरसावतील अशी आशा शहरातील बांधकाम व्यावसायिक, विकासकांना आहे.
--
प्रतिक्रिया
--
दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी महागड्या जमिनीवर प्लॉटिंग सुरू केलेली आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे प्लॉट विक्री संथ आहे. व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक ठप्प आहे. या परिस्थितीत जमीन मालक जमिनीचे दर कमी करत नसल्याने प्लॉटचे दर स्थिर आहेत, मात्र कमी झाले नाहीत. पंधरा लाखापर्यंतच्या प्लॉटला मागणी आहे. मात्र महागड्या प्लॉटची खरेदी कमी आहे.
- प्रशांत जगताप,
क्रेडाई असोसिएशन, उदगीर.
------