वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे उदगीरमध्ये उद्घाटन
--
उदगीर, ता. १६ (बातमीदार) : उदगीर व देवणी तालुक्यांतील अध्यापकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास येथील पोस्ते पोद्दार शाळेत सुरवात झाली. प्रशिक्षणाचे उद्घाटन जि.प.सदस्य प्रा. दिलीप मटके यांच्या हस्ते झाले. दोन्ही तालुक्यांतील सुमारे ३०० शिक्षकांसाठी हे दहा दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. शिक्षकांच्या गरजा, बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी सात गट तयार करण्यात आले असून, २८ सुलभक मार्गदर्शन करीत आहेत. गटशिक्षणाधिकारी शफी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी शिवराज थोटे समन्वयक, तर जी.पी. भोळे व धनाजी जाधव सहायक समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.जे. शेकापुरे होते. डॉ.डी.व्ही. मुंढे यांनी प्रास्ताविक, तर सुधीर साबणे यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रप्रमुख अंजली स्वामी यांनी आभार मानले.