--
दुकानाच्या लोखंडी अँगलमुळे दुचाकीस्वार जखमी
------------
उदगीर शहरातील घटना, दुकानदारासह कामगाराविरुद्ध गुन्हा नोंद
--
उदगीर, ता. २७ (बातमीदार) : शहरातील बिदर रोडवरील छत्रपती शाहू महाराज चौकातील दुकानातून लोखंडी अँगल रस्त्यावर ढकलण्यात आल्याने दुचाकीवरून जाणारा २१ वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला. या घटनेत विद्यार्थ्यांच्या नाकाचे हाड मोडले असून, वरच्या ओठालाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात दुकानदार आणि वजनकाट्यावर काम करणाऱ्या कामगाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तालुक्यातील रावणगाव येथील अनुराग शिवाजी बिरादार (वय २१) हा डी. फार्मसीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. तो. २४ ऑक्टोबरला रात्री सात वाजता दुचाकीवरून घरी जात होता. तो छत्रपती शाहू महाराज चौकात आला. तेव्हा एस. के. ट्रेडर्स या दुकानातून वजनकाट्याजवळील लोखंडी अँगल अचानक रस्त्यावर ढकलण्यात आला. हा अँगल अनुरागच्या नाकावर आदळल्याने तो दुचाकीवरून खाली पडला. या अपघातात त्याच्या नाकाचे हाड मोडले, तसेच वरच्या ओठालाही गंभीर दुखापत झाली.ओठाच्या आतील बाजूस चार, तर बाहेरील बाजूस दोन टाके घालण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
लोखंडी अँगल हाताळताना आवश्यक ती खबरदारी न घेता निष्काळजीपणे तो रस्त्यावर ढकलण्यात आल्यामुळे गंभीर दुखापत झाल्याची तक्रार अनुरागने पोलिसांकडे केली. या तक्रारीवरून दुकानदार वजीर खादर आणि दुकानातील वजनकाट्यावर काम करणाऱ्या एका कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक रेडेकर करीत आहेत.
निष्काळजीपणामुळे अनेक अपघात
सळई विक्री करणाऱ्या दुकानासमोर आतापर्यंत दुकानदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेक अपघात घडले आहेत अत्यंत मोठमोठे अँगल, सगळ्या भरस्त्यावर गाड्या उभ्या करून भरल्या जातात.त्यामुळे विद्यार्थी व सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. चौकालगत असलेले भर रस्त्यावरील दुकान स्थलांतरित करून शहराबाहेर नेण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
--------