अँकर पान ३
--
उकडीच्या मोदकांनाही बसली महागाईची झळ
एक मोदक ४० रुपयांचा; २१ मोदकांसाठी मोजावे लागणार ८४० रुपये
---
जळकोट, ता. १२ (बातमीदार) ः गणरायाच्या नैवेद्यातील मानाचा पदार्थ असलेल्या उकडीच्या मोदकाला यंदा महागाईचा तडका बसला आहे. गणरायाच्या नैवेद्यासाठी २१ मोदकांची परंपरा असताना मोठ्या आकाराच्या एका मोदकासाठी ४० रुपये मोजावे लागत असल्याने २१ मोदकांसाठी तब्बल ८४० रुपये खर्च येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत मोदकांच्या दरात वाढ झाली असून, मध्यम आकाराचा मोदक ३० ते ३५ रुपये, तर मोठा मोदक ४० रुपयांना मिळत आहे. नारळ, गूळ, साखर, तूप, वेलची, जायफळ आणि गॅसच्या वाढलेल्या दरांचा परिणाम मोदकांच्या किमतीवर झाला आहे.
उकडीचे मोदक दिसायला आकर्षक आणि चवीला स्वादिष्ट असल्याने त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गतवर्षी मोदकाचा दर २५ ते ३० रुपये होता. यंदा मध्यम आकाराच्या मोदकाचा दर ३० ते ३५ रुपये, तर मोठ्या मोदकाचा दर ४० रुपये आहे. तळणीचे मोदक प्रामुख्याने होमात आहुती देण्यासाठी खरेदी केले जातात. उकडीच्या मोदकांसाठी तांदळाचे पीठ, किसलेला गूळ, खोवलेला नारळ, वेलची पूड आणि जायफळ पूड यांसारखे साहित्य आधीच तयार करून ठेवावे लागते. मोदक बनविण्यासाठी वेळही अधिक लागतो. त्यामुळे पूर्वतयारीनिशी पाककृती करावी लागते. गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत एका उद्योजिकेकडून सुमारे एक ते दीड हजार मोदक तयार केले जातात.
---
मोदकांचे दर असे...
उकडीचा मोदक ः ४० रुपये नग
उकडीचा मोदक फ्लेवर्ड (मँगो, गुलकंद) : ४५ रुपये नग
तळणीचा मोदक: २० रुपये
खवा मोदक ः ७५० रुपये किलो
चॉकलेट मोदक: १००० रुपये किलो
---
नारळ, गूळ, गॅस, साखर, तूप, वेलची, जायफळ या सगळ्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे यंदा उकडीच्या मोदकाचे दर अपेक्षेपेक्षा वाढले. गेल्यावर्षी २२ ते २५ रुपयांना मिळणारा मोदक यंदा ३० ते ३५ रुपयांना मिळणार आहे. एका दिवसात किमन हजार मोदक करतो. तळणीचे मोदक बरेच दिवस टिकतात. त्यामुळे त्यांचीही मागणी गणेश मंडळांकडून अधिक आहे.
- विनोज जोशी, मोदक व्यापारी