शंभर खाटांच्या रुग्णालयातील सेवेवर परिणाम?
उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
उमरगा, ता. १७ : राज्याच्या आरोग्य विभागाने नुकत्याच केलेल्या बदली प्रक्रियेत उमरगा येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयातील तीन प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रुग्णालयात ‘हर्निया’ आणि सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर सिझेरियनसह इतर सामान्य शस्त्रक्रिया सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यातच रुग्णालयातील फिजिशियनचे पद रिक्त असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्रणांचा अपेक्षित वापर होण्यात अडचणी येत आहेत. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना सिझेरियनसाठी रेफर करावे लागत आहे.
सध्या रुग्णालय प्रशासनाकडून कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. तसेच रुग्णालय प्रमुखांबाबत झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण स्वामी यांनी बैठक घेऊन काही सूचना दिल्या होत्या. त्यानंतर रुग्णालयातील प्रशासकीय पातळीवर विविध घडामोडी सुरू आहेत.
-----
बदली झालेले अधिकारी
डॉ. आशा कदम (क्ष-किरण तज्ज्ञ)
डॉ. विनोद जाधव (बालरोग तज्ज्ञ)
डॉ. सिफाना तांबोळी (स्त्रीरोग तज्ज्ञ)
-----
सोनोग्राफी सेवा पूर्ववत करा
उपजिल्हा रुग्णालयात कमी दरात सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध असून सोनोग्राफी, मॅमोग्राफी यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचाही रुग्णांना लाभ मिळत होता. मात्र, क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. आशा कदम यांच्या बदलीनंतर सोनोग्राफी सेवा अडचणीत येण्याची शक्यता आहे. ही सेवा नियमित आणि पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने उमरगा उपजिल्हा रुग्णालयात तातडीने रेडिओलॉजिस्टची नियुक्ती करावी, अशी मागणी रुग्णांमधून होत आहे.