फिजिशियनअभावी सिझेरियनसह सामान्य शस्त्रक्रिया ठप्प
----
तीन महिन्यांपासून रुग्णांना अन्यत्र रेफर; खासगी उपचारांचा आर्थिक भार
---
उमरगा, ता. २ (बातमीदार) : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात तीन महिन्यांपासून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या सिझेरियन शस्त्रक्रियासह हर्निया, अपेंडिक्स आदी सामान्य शस्त्रक्रिया बंद आहेत. हर्निया आणि सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर दोन महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटनांनंतर रुग्णालयातील शस्त्रक्रियांच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर सिझेरियनसह इतर सामान्य शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. फिजिशियनची उपलब्धता नसणे, हा या समस्येतील प्रमुख मुद्दा ठरला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेल्या उमरगा शहरात सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असून, बाह्यरुग्ण विभागात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येतात. अपघातग्रस्तांसह विविध आजारांच्या रुग्णांवर येथे उपचार केले जातात. रुग्णालयाच्या कारभाराबाबत यापूर्वी लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित करून सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाकडून विविध सुविधा अद्ययावत करण्याचा प्रयत्न होत असला, तरी प्रत्यक्ष आरोग्यसेवेतील सुसूत्रता आणि तज्ज्ञ मनुष्यबळाचा प्रश्न कायम आहे.
उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा असल्याने महिलांची मोठी गर्दी असते. मात्र, हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर उमरगा शहरातील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. चौकशी अहवालानंतर संबंधित दोन डॉक्टरांसह एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणानंतर तज्ज्ञ फिजिशियनच्या उपलब्धतेचा मुद्दा ऐरणीवर आला. परिणामी, शस्त्रक्रियांची जोखीम घेण्यास डॉक्टर तयार नसल्याने तीन महिन्यांपासून सिझेरियन शस्त्रक्रिया बंद आहेत. सध्या नैसर्गिक प्रसूती आणि कुटुंबकल्याणाच्या शस्त्रक्रिया सुरू आहेत. मात्र, सिझेरियनची गरज असलेल्या महिलांना लातूर येथील शासकीय रुग्णालयाकडे रेफर केले जाते. परगावी जाण्याऐवजी काही नातेवाईक खासगी रुग्णालयांचा पर्याय निवडत असून, त्यामुळे त्यांच्या खिशावर मोठा आर्थिक भार पडत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून काही शस्त्रक्रिया होत असल्या, तरी मर्यादित पॅकेज आणि काही ठिकाणी आगाऊ रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारींमुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
----
फिजिशियनअभावी अडचणी
उपजिल्हा रुग्णालयात दोन स्त्रीरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाआधारे यापूर्वी अनेक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. मात्र, काही प्रकरणांतील मृत्यूच्या पार्श्वभूमीवर फिजिशियन उपलब्ध नसताना शस्त्रक्रिया करण्याच्या निर्णयावर वरिष्ठ स्तरावर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे डॉक्टरांकडून शस्त्रक्रियेची जोखीम घेण्यास टाळाटाळ होत आहे. दरम्यान, फिजिशियनच्या नियुक्तीसाठी आरोग्य विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. ७ जुलै २०२६ रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांनी उमरगा शहरातील एका फिजिशियन डॉक्टरच्या नियुक्तीचे आदेश काढले होते. मात्र, संबंधित डॉक्टर रुजू झाले नाहीत. कायमस्वरूपी नियुक्तीसोबतच मानधन तत्त्वावर फिजिशियन उपलब्ध करून देण्याचा पर्यायही तातडीने राबविण्याची गरज आहे. फिजिशियनची नियुक्ती झाल्यास सध्या बंद असलेल्या सिझेरियनसह अन्य सामान्य शस्त्रक्रिया पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
-------
((कोट))
उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती, सिझेरियनसह अन्य सामान्य शस्त्रक्रियांची यंत्रणा आहे. मध्यंतरी हर्निया शस्त्रक्रियेनंतर एका महिलेचा मृत्यू झाला. संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याने शस्त्रक्रियेसाठी कोणीही जोखीम घेण्यास तयार नाही. वरिष्ठांकडे फिजिशियन डॉक्टरांची मागणी केली आहे. संबंधित रुग्ण व नातेवाइकांनी सिझेरियन प्रसूतीसाठी फिजिशियन डॉक्टरांकडून फिटनेस प्रमाणपत्र आणल्यास शस्त्रक्रिया केल्या जातात.
- डॉ. कोमल गरड-जाधव, वैद्यकीय अधीक्षक