५४ गावातील एक हजार ३५६ मराठा बांधवाना मिळाले कुणबी मराठा जात प्रमाणपत्र

५४ गावातील एक हजार ३५६ मराठा बांधवाना मिळाले कुणबी मराठा जात प्रमाणपत्र
Published on
५४ गावांतील १,३५६ जणांना कुणबी मराठा जात प्रमाणपत्र - - उमरगा, लोहारा तालुक्यात १०३ आढळल्या नोंदी - - उमरगा, ता. २१ (बातमीदार) :  जुन्या नोंदीनुसार मराठा समाजाला ओबीसी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया प्रशासनाने राबविली आहे. नोंदी आढळलेल्या गावातील संबंधितांना कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे काम तत्परतेने महसूल प्रशासनाने केले आहे. दरम्यान, उमरगा, लोहारा तालुक्यातील ५४ गावांत आढळून आलेल्या नोंदीनुसार एक हजार ३५६ मराठा बांधवाना कुणबी मराठा, कुणबीचे जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे. उमरगा तालुक्यात महसूल विभागाने मोडी आणि मराठी या भाषेतील दस्तऐवजाची तपासणी करून कुणबी मराठा नोंदीची माहिती घेतली होती. त्यात १०३ नोंदी आढळून आल्या आहेत. नोंदीच्या अनुषंगाने कुणबी मराठा, कुणबी प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या प्रस्तावानुसार उमरगा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाने २०२४ पासून प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू केले आहे. २०२५ आणि २०२६ मध्ये प्रमाणपत्र वाटप करण्याची संख्या वाढली. उमरगा तालुक्यात १० सप्टेंबर २०२६ च्या अहवालानुसार ७३६ लोकांना ओबीसी जात प्रमाणपत्राचे वितरण केले आहे. तर ११ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या शिबिरात मुरूम महसूल मंडळात तिघांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. भिकार सांगवी, गुंजोटी येळी, आलूर, तुगांव, मानेगोपाळ,  कडदोरा, दगडधानोरा, मुरूम, उमरगा, व्हंताळ, कुन्हाळी, नाईचाकूर, चिंचोली (भुयार), तलमोड, कोळसूर (कल्याणी), मुळज, दाबका, दाळिंब, जकेकूर/जकेकूरवाडी, सुंदरवाडी, माडज, तुरोरी, औराद, महालिंगरायवाडी, वागदरी, जगदाळवाडी, एकोंडी (जहागिर), मळगीवाडी, चंडकाळ, रामपूर, पेठसांगवी, कदेर, नारंगवाडी, हिप्परगाराव, कसगी, कराळी, डिग्गी, आष्टा (जहागिर) या गावातील नागरिकांना कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. लोहारा तालुक्यात ५२८ प्रमाणपत्र देण्यात आले. या शिवाय नुकत्याच झालेल्या शिबिरात १५ लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले. सास्तूर, नागराळ, राजेगाव, हराळी, खेड, धानुरी, लोहारा (खुर्द), तोरंबा, जेवळी, करजगाव, भागातळी, माकणी, होळी, बेलवाडी, चिंचोली काटे येथील नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. दरम्यान, न्या. शिंदे समितीच्या सूचनेनुसार तालुक्यातील कुणबी नोंदीच्या दस्तऐवजाची पुनश्च तपासणी झाल्याने नोंदी वाढल्या अन् त्याचा फायदा मराठा बांधवांना झाला. - - ((कोट)) मराठा कुणबी, कुणबी, कुणबी मराठा जातीच्या नोंदीच्या अनुषंगाने उमरगा तालुक्यात आत्तापर्यंत ७३६ जात प्रमाणपत्रं देण्यात आली आहेत. या महिन्यात ११ व १६ तारखेला घेतलेल्या दोनदिवसीय विशेष शिबिराच्या माध्यमातूनही यासाठी प्रतिसाद मिळाला. त्यात नारंगवाडी महसूल मंडळात ३१, तर मुरूम महसूल मंडळात तीन प्रस्ताव दाखल झाले आहेत. आढळलेल्या नोंदीनुसार, आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असून, यात पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे काम केले जात आहे. - गोविंद येरमे, तहसीलदार -----
Marathi News Esakal
www.esakal.com