उमरगा आगारावर तुळजाभवानीची कृपादृष्टी
- -
नवरात्रोत्सव, आश्विन पौर्णिमेच्या यात्रोत्सवातून सव्वाकोटीचे उत्पन्न
- -
अविनाश काळे
उमरगा, ता. २९ (बातमीदार) : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सव व अश्विन पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर उमरगा बस आगाराला मोठे यश मिळाले आहे. यात्रेच्या काळात केलेल्या योग्य आणि नियोजनबद्ध एसटी फेऱ्यांमुळे उमरगा आगाराला तब्बल १ कोटी २० लाख ७३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक येतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उमरगा आगाराने भाविकांच्या प्रवासाची विशेष सोय केली होती.
- -
विशेष बसचे नियोजन
उमरगा आगाराच्या ताफ्यात मुंबई, पुणे, सोलापूर, लातूर आणि छत्रपती संभाजीनगरसह ग्रामीण भागासाठी स्वतःच्या ६५ बस आहेत. मात्र, नवरात्र यात्रेतील भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ८ ऑक्टोबरपासून विशेष नियोजन करण्यात आले. यामध्ये उमरगा आगाराच्या ९ बस, पुणे येथून १० बस, अंबड आगाराच्या ४ बस परतूर आगाराच्या ५ बस अशा एकूण २८ विशेष बस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या होत्या. याशिवाय, अश्विन पौर्णिमेच्या दिवशी भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी उमरगा आगाराच्या २२ अतिरिक्त बस सोडण्यात आल्या होत्या.
- -
१,७१० फेऱ्या, एक लाख
८३ हजार किमीचा प्रवास
आगाराने केलेल्या चोख नियोजनामुळे कर्नाटकातील हुमनाबाद मार्गावर ५५० फेऱ्या, कलबुर्गी मार्गावर २६७ फेऱ्या, तर तुळजापूर ते सोलापूर व लातूर मार्गावर ८९३ फेऱ्या पार पडल्या. अशा प्रकारे एकूण १,७१० फेऱ्यांमधून एक लाख ८३ हजार किलोमीटर अंतर कापले गेले. या २० दिवसांच्या कालावधीत आगाराच्या तिजोरीत सवलत मूल्य गृहीत धरून सव्वाकोटीचे उत्पन्न झाले आहे.
हे उत्पन्न मिळवून देण्यात चालक, वाहक, यांत्रिक विभाग तसेच हुमनाबाद, कलबुर्गी व तुळजापूर येथे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले.
....................
((कोट))
एसटी महामंडळाचा प्रवास सुरक्षित असल्याने प्रवाशांचा नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो. नवरात्र यात्रेसाठी केलेले चोख नियोजन आणि चालक-वाहक, यांत्रिक कामगार व कर्मचाऱ्यांमधील उत्तम समन्वय यांमुळे भाविकांना सुरक्षित व सुखकर प्रवास देता आला. प्रवाशांची मिळालेली साथच या उत्पन्नाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.
- पी. व्ही. कुलकर्णी, आगार व्यवस्थापक, उमरगा