खरिपाने हात झटकले; परतीच्या पावसाने रब्बीची आशा
उमरगा मंडळात ८३ मिलिमीटर पाऊस; मात्र तालुक्यात सर्वदूर हुलकावणी
अविनाश काळे
उमरगा, ता. २१ : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरिपातील पिकांचे उत्पादन दहा ते पंधरा टक्क्यांवर आले असताना रविवारी (ता. २०) मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास उमरगा महसूल मंडळात यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक ८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली असली, तरी तालुक्यातील अन्य चार महसूल मंडळांत मात्र जेमतेम पाऊस झाला. या पावसामुळे कोरडेठाक पडलेल्या नदी-नाल्यांत काही प्रमाणात पाणी आले असून, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
उमरगा तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र, पावसाने मोठा खंड दिल्याने ऐन वाढीच्या आणि शेंगा धरण्याच्या काळात पिकांना तीव्र उन्हाच्या झळा बसल्या. परिणामी, सोयाबीनसह अन्य पिके करपून गेली. पिके वाचविण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात परतीच्या पावसाला सुरवात झाली आहे. शुक्रवारी (ता. १८) पहाटे मुरूम महसूल मंडळात ४६.८० मिलिमीटर पाऊस झाला होता. रविवारी उमरगा मंडळात ८३ मिलिमीटर पाऊस झाला. दाळिंब मंडळात पावसाची नोंद झाली नाही, तर नारंगवाडी मंडळात १९, मुळजमध्ये २९ आणि मुरूममध्ये ११.५० मिलिमीटर पाऊस झाला.
रब्बीसाठी पावसाची गरज
खरीप हंगाम वाया गेल्याचे शल्य शेतकऱ्यांच्या मनात आहे. परतीचा पाऊस सुरू झाला असला, तरी खरिपासाठी त्याचा फायदा होण्याचे दिवस संपले आहेत. आता हा पाऊस रब्बीच्या पेरणीसाठी उपयुक्त ठरू शकतो. मात्र, पाऊस सर्वदूर आणि मुबलक प्रमाणात झाला तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
................
((कोट))
९० वर्षीय आजारी वृद्ध व्हेंटिलेटरवर असताना त्याला ‘काजू-बदाम’ भरवून तो बरे होईल का?, असा प्रश्न आहे. ऐन मोसमात पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हातातून गेला आहे. उत्पादन अवघ्या पाच ते दहा टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे आता परतीच्या पावसाकडून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, त्यासाठी सर्वदूर दमदार पाऊस होणे आवश्यक आहे.
- अशोक पवार, चिंचोली भुयार