विनापरवाना बोअरवेल मारल्यास मशीन जप्त अन् थेट फौजदारी
महसूल विभागाची परवानगी आता अनिवार्य; तहसीलदारांचा कडक इशारा
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १५ ः जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा आता अधिक तीव्र होऊ लागल्या असून, भूजल पातळीत तब्बल साडेचार मीटरची भीषण घट झाल्याने पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाणीटंचाईच्या या गंभीर संकटाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने अनधिकृत पाणी उपशावर कारवाईचा इशारा दिला आहे. महसूल विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्ह्यात कुठेही बोअरवेल (विंधन विहीर) घेण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली आहे. छुप्या मार्गाने बोअरवेल मारल्यास मशीन थेट जागेवरच जप्त करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे.
पाण्याची घटती पातळी आणि अनिर्बंध उपसा यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी रसातळाला गेली आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट उभे राहू नये, यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. बीड तहसील प्रशासनाकडून तालुक्यातील तब्बल २२ बोअरवेल मशीन मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या दणक्यामुळे विनापरवाना बोअरवेल मारणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
कायदेशीर मार्गाने परवानगी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून, शनिवारपर्यंत केवळ बीड तहसील कार्यालयात कायदेशीर परवानगीसाठी १८६ अर्ज दाखल झाले आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे काटेकोर नियोजन करण्यासाठी महसूल विभागाने आपली यंत्रणा पूर्णपणे सतर्क केली आहे. यापुढे अनधिकृत बोअरवेल घेणाऱ्यांवर धडक कारवाई केली जाणार असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.
-----
परवानगीसाठी कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक?
१) शेतीचा ७/१२ आणि ८-अ चा उतारा.
२) शेतात फळबाग असल्यास त्याची ७/१२ उताऱ्यावर कायदेशीर नोंद असणे आवश्यक.
३) सद्यस्थितीत पाण्याअभावी जे पीक जळत आहे किंवा सुकत आहे, त्याची उताऱ्यावर स्पष्ट नोंद असणे गरजेचे आहे.
------------
कोट
जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी टिकवून ठेवणे आणि पाण्याचा सुरळीत पुरवठा करणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. महसूल विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही अनधिकृतपणे बोअरवेल मारल्याचे निदर्शनास आल्यास कसलीही हयगय केली जाणार नाही. संबंधित दोषींवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची बोअरवेल मशीन जप्त केली जाईल. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- चंद्रकांत शेळके, तहसीलदार, बीड