१९ वर्षांखालील क्रिकेट संघाच्या निवडीसाठी ८ आणि ९ रोजी चाचणी
छत्रपती संभाजीनगर, ता. ४ : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे औरंगाबाद जिल्ह्याचा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ निवडण्यासाठी ८ व ९ ऑक्टोबरला निवड चाचणी होणार आहे.
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर यांनी १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची निवड करण्यासंदर्भात एडीसीए मैदानावर एक नियोजनात्मक बैठक घेतली. या बैठकीत १९ वर्षांखालील संघ निवडीवर चर्चा करण्यात आली. निवड चाचणी प्रक्रियेपूर्वी खेळाडूंनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी खेळाडूंनी ६ आणि ७ ऑक्टोबरला दुपारी ४ ते ६ या वेळेत एडीसीए मैदानावर आपली नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी संदर्भात अरुण गुदगे आणि अक्षय गोयल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहसचिव करण डोगरा यांनी केले आहे.
१९ वर्षांखालील क्रिकेट संघाची चाचणी घेऊन खेळाडूंची निवड माजी कसोटीपटू इक्बाल सिद्दिकी, दीपक जोशी, विशाल लोळगे, मोहन बोरा, कर्मवीर लव्हेरा, दीपक जाजू, प्रदीप जगदाळे, विवेक येवले यांची निवड समिती करणार आहे. एडीसीए मैदानावर झालेल्या बैठकीला करण डोगरा, निखिल मिटकर, सुधीर भालेराव, अरुण गुदगे, विशाल लोळगे, मोहन बोरा, कर्मवीर लव्हेरा, मिलिंद पाटील, प्रसाद कुलकर्णी, अक्षय गोयल आदी उपस्थित होते.