लक्षवेधी सूचना आणि स्थगन प्रस्ताव

लक्षवेधी सूचना आणि स्थगन प्रस्ताव
Published on
(((कायद्याचं बोला))) कामकाज थांबवून चर्चा की फक्त सरकारचा जबाब? संसदेत गदारोळ घडवणारे ‘ते’ दोन शब्द; लक्षवेधी सूचना अन् स्थगन प्रस्ताव संसदेचं अधिवेशन सुरू असलं की ‘अमुक विषयावर लक्षवेधी सूचना मांडली’, ‘तमुक विषयावर लोकसभेत विरोधकांचा स्थगन प्रस्ताव फेटाळला’ अशी परिचित वाक्यं वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळतात. मात्र लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर काय होतं किंवा स्थगन प्रस्ताव फेटाळला म्हणजे नेमकं काय झालं, हे सहजपणे स्पष्ट होत नाही. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले आणि देश हादरला. त्यानंतर राज्यसभेत या घटनेवर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. सरकारने सभागृहासमोर आपली भूमिका मांडली आणि सदस्यांनी सुरक्षा व्यवस्था, तपास आणि पुढील उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले. अशा गंभीर आणि तातडीच्या प्रसंगी शून्य प्रहरासारख्या मार्गांनी केवळ घटना सभागृहाच्या निदर्शनास आणणं पुरेसं नसतं. सरकारने त्याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही असते. लक्षवेधी सूचना हा त्यासाठीचा संसदीय मार्ग आहे आणि ती दोन्ही सभागृहांत मांडता येते. यावर मतदान होत नाही. काही वेळा मात्र गंभीर आणि तातडीच्या विषयावर ‘केवळ सरकारचं निवेदन नको तर त्या दिवसाचं ठरलेलं कामकाज बाजूला ठेवून आधी चर्चा झाली पाहिजे‘ अशी मागणी सदस्य करतात. याला स्थगन प्रस्ताव असे म्हणतात. तो केवळ लोकसभेतच मांडता येतो. राज्यसभेत अशा स्वरूपाची तरतूद नाही. त्यासाठी अध्यक्षांची संमती आणि किमान पन्नास सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. हे निकष पूर्ण झाल्यावर नियमित कामकाज बाजूला ठेवून त्या विषयावर चर्चा घेतली जाते. इथे स्थगन प्रस्तावाचे दोन टप्पे समजून घेणं महत्त्वाचं आहे. अध्यक्षांनी प्रस्ताव चर्चेला घेण्यास परवानगी देणं म्हणजे तो मंजूर झाला, असा अर्थ होत नाही. प्रथम प्रस्तावावर चर्चा होते; त्यानंतर सभागृह मतदानातून तो मंजूर किंवा नामंजूर करू शकतं. तो अखेरीस मंजूर झाला, तर संसदीय परंपरेत त्याला सरकारवरील ठपक्याचं स्वरूप प्राप्त होतं. २०१४ मध्ये महागाईच्या प्रश्नावर विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली होती. मात्र अध्यक्षांनी तो स्थगन प्रस्ताव म्हणून स्वीकारला नाही, पण विषयावरील चर्चा नाकारलीही नाही. त्यावेळी नियम १९३ अंतर्गत चर्चा घेण्यात आली. या नियमाखाली सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होते. मात्र शेवटी कोणताही प्रस्ताव मतदानासाठी ठेवला जात नाही. म्हणजे २०१४ मध्ये स्थगन प्रस्ताव नाकारला गेला, तरी त्याच विषयावरील चर्चा दुसऱ्या संसदीय मार्गाने झाली. तातडीचा विषय सभागृहाच्या निदर्शनास आणणं, त्यावर सरकारची अधिकृत भूमिका मागणं किंवा नियमित कामकाज बाजूला ठेवून त्या विषयावर सभागृहाचा निर्णय मागणं; या प्रत्येक प्रक्रियेचं स्वरूप आणि परिणाम वेगळे आहेत. त्यामुळे या वेगवेगळ्या संसदीय मार्गांचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. संसदीय कामकाजाचं चित्र अधिक स्पष्ट होणं व त्यातील प्रक्रियांची जाण वाढणं, सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. - ॲड. देवदत्त पालोदकर ९९६०२२२२३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com