विद्यापीठाच्या दोन विद्यार्थिनींची संसदेत भाषणासाठी निवड
‘नो युवर लीडर’ उपक्रमात राष्ट्रीय स्तरावर यश; कुलगुरूंच्या हस्ते सत्कार
छत्रपती संभाजीनगर, ता. ५ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दोन विद्यार्थिनींची लोकसभा सचिवालयांतर्गत संसदीय लोकशाही संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (प्राइड) यांच्या ‘नो युवर लीडर’ या राष्ट्रीय उपक्रमासाठी निवड झाली. शेख शिफा शमशु आणि अनिशा वसंत हांगे अशी त्यांची नावे आहेत.
या दोघींना ३१ ऑक्टोबरला संसदेच्या ‘संविधान सदन’ येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर भाषण करण्याची संधी मिळाली. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि युवा कल्याण विभागाच्या समन्वयाने २०२२ पासून हा उपक्रम राबविण्यात येतो. देशातील महान नेत्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांची नामांकने मागविली जातात. यंदा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून १०८ सहभागींची निवड करण्यात आली. विद्यापीठात झालेल्या वक्तृत्व, वादविवाद आणि प्रश्नमंजूषा स्पर्धांमधील गुणवत्ता यादीच्या आधारे मौलाना आझाद महाविद्यालयाची शेख शिफा शमशु आणि स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई येथील अनिशा हांगे यांची नामांकने पाठविण्यात आली होती. त्यानंतर प्राइडतर्फे ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा, वक्तृत्व कौशल्य, भाषेवरील प्रभुत्व आणि नेत्यांच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड घालण्याची क्षमता अशा विविध निकषांवर चाचणी घेण्यात आली. त्यात दोघींनी यश मिळविले. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. संजय कवडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभुरे आणि सांस्कृतिक समन्वयक गौतम सोनवणे उपस्थित होते.