विनापरवाना सावकारीप्रकरणी वाडी पुयड येथे झडती
संशयिताच्या घरासह दुकानाची तपासणी; हिशेब वह्या, दस्तऐवज ताब्यात
------------
नांदेड, ता. २७ : विनापरवाना सावकारी व्यवहाराबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने नांदेड तालुक्यातील वाडी पुयड येथे संशयित सावकाराच्या घरासह दुकानाची झडती घेतली. या कारवाईत संशयित सावकारी व्यवहारांशी संबंधित हिशेब वह्या आणि दस्तऐवजांच्या प्रती पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्या.
गजानन प्रभाकर कदम (रा. वाडी पुयड, ता. जि. नांदेड) यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने २२ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील कलम १६ अन्वये त्यांच्या घराची आणि दुकानाची झडती घेण्यात आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास कायद्यानुसार करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली, लातूरचे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे आणि नांदेडचे उपनिबंधक किशन फिसके यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी या कारवाईसाठी प्रशासकीय सहकार्य केले.
या पथकात सहकार अधिकारी एम. आर. येवते, बी. बी. बोधगिरे, जी. यू. कुटे, एस. एन. पटके, मुख्य लिपिक ए. वाय. दीक्षित, सहायक सहकार अधिकारी ए. ए. शिंदे, ए. व्ही. वडेपल्ली आणि कनिष्ठ लिपिक एस. व्ही. करंजे यांचा समावेश होता. पोलिस बंदोबस्तात आणि पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय तक्रार करण्याचे आवाहन
जिल्ह्यात विनापरवाना सावकारी करणाऱ्या व्यक्तींबाबत नागरिकांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा जिल्हा निबंधक (सावकारी), नांदेड किंवा संबंधित तालुक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रार करावी, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.