शेतकऱ्यांना भरीव मदत
द्या ः आमदार डॉ.गुट्टे
गंगाखेड, ता.२० (बातमीदार) : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने भरीव शासकीय मदत द्यावी अशी मागणी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.
नांदेड येथे कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या आढावा बैठकीत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यांतील पिकांची स्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर यांसह खरीप पिकांवर परिणाम होत असल्याने वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी. पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि आवश्यक दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, सोशल मीडियावर प्रसारित होणारी दुष्काळाची यादी अधिकृत नसल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले. पीक नुकसानीची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार डॉ. गुट्टे यांनी नमूद केले.
----------